Afghanistan: काबूलवरुन उड्डाण घेतलेल्या विमानाच्या चाकात आढळले मानवी अवशेष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 11:47 AM2021-08-18T11:47:50+5:302021-08-18T11:48:08+5:30
Afghanistan Crisis: दोन दिवसांपूर्वीच काबूल विमानतळावर विमानातून पडून काही लोकांचा मृत्यू झाला होता.
वॉशिंग्टन:अफगाणिस्तान(Afghanistan)मध्ये तालिबानच्या भीतीचे नवे पुरावे समोर आले आहेत. अमेरिकन हवाई दलाकडून मिळालेल्या माहितीने अनेकांना धक्का बसला आहे. सोमवारी काबूलहून उड्डाण केलेलेल्या हवाई दलाचे C-17 ग्लोब मास्टर विमान कतारमध्ये उतरले. त्या विमानाच्या चाकांवर मानवी शरीराचे अवशेष आढळून आले आहेत.
अमेरिकन हवाई दलाचा तपास सुरू
अमेरिकेच्या हवाई दलाने म्हटले आहे की, ते काबुलहून उड्डाण घेतलेल्या सी -17 विमानाच्या चाकावर सापडलेल्या मानवी शरीराचे अवशेष तपासत आहे. हवाई दलाच्या निवेदनात म्हटले आहे की, रविवारी सी -17 ग्लोबमास्टर काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. काही जीवनावश्यक वस्तू तेथे विमानाद्वारे पाठवण्यात आल्या. परंतु उपकरणे काढण्यापूर्वी शेकडो अफगाणांनी विमानात प्रवेश केला. बिघडलेली परिस्थिती पाहून पायलटने शक्य तितक्या लवकर विमान परत घेण्याचा निर्णय घेतला.
काबूल विमानतळावर चेंगराचेंगरी
दरम्यान, अफगाणिस्तानाततालिबानने ताबा मिळवल्यानंतर देश सोडणाऱ्यांच्या रांगा थांबायचे नाव घेत नाहीत. काबूल विमानतळावर अनेक दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. लोकांना कोणत्याही किंमतीत देश सोडून जायचे आहे. दोन दिवसांपूर्वीही एक धक्कादायक घटना काबूल विमानतळावर घडली होती. देश सोडून जाण्यासाठी विमानावर लटकलेल्या काही नागरिकांचा उंचीवरुन पडून मृत्यू झाला होता. त्याचा व्हिडिओही मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाला. तो व्हिडिओ पाहून तेथील नागरिकांच्या मनातील भीतीची अंदाज लावता येईल.