Afghanistan Kabul Blast : काबूलमधील मशिदीत मोठा स्फोट; 20 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 11:38 PM2022-08-17T23:38:52+5:302022-08-17T23:39:12+5:30
Blast in Kabul Mosque: या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून जवळपास 40 जण गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे.
अफगाणिस्तानातील काबूलमध्ये असलेल्या एका मशिदीत मोठास्फोट झाला आहे. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून जवळपास 40 जण गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे. काबूलमधील इमरजन्सी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण 27 जणांना तेथे भरती करण्यात आले आहे. यात पाच मुलांचाही समावेश आहे.
या स्फोटानंतर, तालिबानच्या सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसर सील केला असून जखमींना काबूलमधील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबूल शहरातील सर-ए-कोटल खैरखानामध्ये हा बॉम्बस्फोट झाला. काबूलचा सुरक्षा विभाग खालिद जरदानने या स्फोटाची पुष्टी केली आहे.
अद्याप कुठल्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. खरे तर, गेल्या काही महिन्यांत असे अनेक हल्ले झाले आहेत, ज्यांत मशिदींनाच निशाणा बनवण्यात आले आहे. मात्र, या हल्ल्यात एक गोष्ट वेगळी आहे. दहशतवादी संघटना आयएस कडून आतापर्यंत शिया मशिदींना निशाणा बनवण्यात येत होते. पण आज ज्या भागात हा स्फोट झाला. त्या भागात शिया समुदाय राहत नाही.
सध्या काबूलमध्ये तालिबानी सरकार आहे. या सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. अशरफ गनी यांना सत्तेवरून हटवून तालिबानने तेथे कब्जा केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही काबूलमध्ये एका मशिदीत स्फोट झाला होता. त्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच यापूर्वी, अफगाणिस्तानातील गुरुद्वाऱ्यांनाही निशाणा बनवण्यात आले होते.