Afghanistan Blast: अफगाणिस्तानच्या शाळेत मृत्यूचं तांडव; काबूलमध्ये आत्मघाती स्फोट, ४६ विद्यार्थीनींसह ५३ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 08:18 AM2022-10-04T08:18:38+5:302022-10-04T08:19:03+5:30
Afghanistan Blast: आत्मघाती हल्लेखोराने काबूलमधील शिया भागातील एका शाळेवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
Afghanistan Blast: गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील अनेक ठिकाणी एकामागून एक बॉम्ब स्फोट होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पश्चिम काबूलच्या एका शाळेत झालेल्या आत्मघाती स्फोटात ४६ विद्यार्थीनींसह ५३ जण ठार झाले आहेत. या घटनेने अफगाणिस्तान हादरल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम काबूलमधील शाहीद माजरी रोडवरील एका शाळेत आत्मघाती बॉम्बस्फोट झाला आहे. एजन्सीच्या अहवालानुसार, या हल्ल्यात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ४६ विद्यार्थीनी आणि महिलांचाही समावेश आहे. या स्फोटानंतर परिसरात एकच घबराट पसरली. एएफपी या वृत्तसंस्थेने संयुक्त राष्ट्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, काबूलमधील एका शाळेत आत्मघाती बॉम्बस्फोट झाला आहे.
आत्मघातकी हल्लेखोराचा काबूलमधील शिया भागातील एका शाळेवर हल्ला
तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, आत्मघातकी हल्लेखोराने काबूलमधील शिया भागातील एका शाळेवर हल्ला केला. शहराच्या पश्चिमेला असलेल्या दश्त-ए-बरची भागातील काझ एज्युकेशन सेंटरमध्ये हा स्फोट झाला. स्फोट झाला तेव्हा विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश परीक्षा देत होते. त्यामुळे वर्गात अनेक विद्यार्थी होते. दुसरीकडे, गेल्या वर्षी अमेरिकेचे समर्थन असलेले सरकार पाडल्यानंतर तालिबानच्या राजवटीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. असे असतानाही अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका सुरुच आहे.
दरम्यान, अफगाण पीस वॉच या स्वयंसेवी संस्थेने ट्वीटर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, विद्यार्थी असलेल्या ठिकाणी येत एका दहशतवाद्याने स्वत:ला स्फोटाने उडवून दिले. तसेच अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील एका शैक्षणिक संस्थेत ३० सप्टेंबर रोजी स्फोट झाला होता. या आत्मघाती हल्ल्यात १९ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"