तालिबानचा विचित्र निर्णय, अफगाणिस्तानात कर्मचाऱ्यांना वेतनाऐवजी मिळणार गहू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 07:28 PM2021-10-25T19:28:30+5:302021-10-25T19:28:38+5:30
तालिबानने या योजनेतून काबुलमध्ये सुमारे 40,000 लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
काबुल:अफगाणिस्तानाततालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती बिघडत चालली आहे. दीर्घ काळापासून युद्धाने ग्रासलेली देशाची अर्थव्यवस्था आधीच कोलमडली आहे, त्यात तालिबान सत्तेत आल्यापासून परस्थिती आणखी बिकट झाली आहे. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तालिबानच्या अंतरिम सरकारने अजब घोषणा केली आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार, तालिबान आता पैसे नसल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना वेतन देण्याऐवजी गहू आणि इतर धान्य देणार आहे. अफगाणिस्तान दीर्घ काळापासून परदेशी मदतीवर अवलंबून होता, पण आता तालिबान आल्यापासून ही मदत थांबली आहे. तालिबानने या योजनेतून काबुलमध्ये सुमारे 40,000 पुरुषांना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही योजना अफगाणिस्तानच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये लागू केली जाईल.
मेहनत वाढवावी लागेल
तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी म्हटले की, देशातील बेरोजगारीशी लढणे आणि उपासमारीचा सामना करणे महत्त्वाचे आहे. कामगारांना जास्त मेहनत करावी लागेल. अफगाणिस्तान आधीच दारिद्र्य, दुष्काळ, कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेचा सामना करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात येथील नागरिकांना आता आणखी मेहनत करावी लागेल.
पाणलोटक्षेत्र तयार करण्याचे काम
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत काबुलमध्ये दोन महिन्यांत सुमारे 11,600 टन गहू वितरित केला जाईल. याशिवाय, हेरात, जलालाबाद, कंधार, मजार-ए-शरीफ आणि पोल-ए-खोमरीसह देशात इतरत्र सुमारे 55,000 टन गहू वाटप केला जाईल. काबूलमध्ये, दुष्काळाचा सामना करण्यासाठी डोंगरातील बर्फाचे पाणी करुन वापरण्यासाठी जल वाहिन्या खोदणे आणि पाणलोटक्षेत्र तयार करण्याचे काम केले जाईल.