देश सोडण्यासाठी विमानाच्या पंखावर बसून जाताहेत लोक, VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:33 PM2021-08-18T12:33:43+5:302021-08-18T13:07:55+5:30
Afghanistan Crisis: देश सोडण्यासाठी नागरिक आपला जीव धोक्यात घालत असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे.
नवी दिल्ली:अफगाणिस्तानवरतालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. तेथील परिस्थिती दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अफगाणी नागरिक एका चालत्या विमानाच्या पंखांवर बसलेले दिसत आहे. या गर्दीतील एका व्यक्तीनं आपल्या फोनवर हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. देश सोडण्यासाठी नागरिक आपला जीव धोक्यात घालत असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. दरम्यान, या व्हिडिओतील लोकांचं पुढे काय झालं, याची माहिती मिळू शकली नाही.
यापूर्वी काबूलमधून एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात, काही लोक हवेत असलेल्या विमानातून पडताना दिसले होते. अफगाणिस्तानातील महिला, मुले आणि विशेषत: ज्यांनी गेल्या 20 वर्षांत पाश्चिमात्य(अमेरिका) देशांना मदत केली आहे ते अफगाणिस्तान सोडण्यास घाई करत आहेत. तालिबानची सत्ता आल्यामुळे अफगाणिस्तानात त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. तालिबाननं सार्वजनिक माफीची घोषणा केली असली, तरी आधीच्या अनुभवामुळे लोकांचा त्यावर विश्वास नाही.
Afghanistan: काबूलवरुन उड्डाण घेतलेल्या विमानाच्या चाकात आढळले मानवी अवशेष
अफगाणिस्तावर तालिबानचा कब्जा
रविवारी तालिबानने काबूलमध्ये प्रवेश केला. आता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा आहे. अफगाणी नागरिकांना तालिबानी शासनाचा आधीचा अनुभव असल्यामुळे त्यांना अफगाणिस्तानमध्ये राहायचं नाही. त्यांना कुठल्याही परिस्थितीत देश सोडायचा आहे. यासाठी विमान हा एकमात्र पर्याय आहे. यासाठी हजारोंच्या संख्येने अफगाणी नागरिक विमानतळावर येऊन कोणत्याही फ्लाइटमध्ये चढून देशातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहेत. काही लोक निघून जाण्यात यशस्वीही झालेत, पण काही अजूनही त्यांच्या बाहेर जाण्याच्या प्रयत्नात आहेत. दोन दिवसांपूर्वी एक फोटो समोर ला होता. त्यात अमेरिकेच्या हवाई दलाच्या विमानाने 600 हून अधिक लोक बसलेले दिसत होते.