अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या मुठीत, राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सोडला देश, ठिकठिकाणी चकमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 06:18 AM2021-08-16T06:18:40+5:302021-08-16T11:20:50+5:30

Afghanistan president Ashraf Ghani flees country as Taliban captures Kabul : राष्ट्रपती भवनाचा ताबा घेताच तालिबान्यांनी त्याचे नाव इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असे केले. या घटनेनंतर ठिकठिकाणी चकमकी, गोळीबार सुरू आहे.

Afghanistan president Ashraf Ghani flees country as Taliban captures Kabul | अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या मुठीत, राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सोडला देश, ठिकठिकाणी चकमकी

अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या मुठीत, राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सोडला देश, ठिकठिकाणी चकमकी

googlenewsNext

काबुल : तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानच्या सर्वच प्रमुख शहरांचा ताबा मिळविल्यानंतर अखेर राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला आहे. तालिबानी बंडखोरांसमोर अफगाणिस्तान सरकारने गुडघे टेकले असून अध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडून ताजिकिस्तानचा आसरा घेतला आहे. राष्ट्रपती भवनाचा ताबा घेताच तालिबान्यांनी त्याचे नाव इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असे केले. या घटनेनंतर ठिकठिकाणी चकमकी, गोळीबार सुरू आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याचे तालिबानने जाहीर केले. (Afghanistan president Ashraf Ghani flees country as Taliban captures Kabul)

तालिबान्यांनी सकाळीच काबुलला वेढा देत महत्त्वाची प्रवेशकेंद्रे ताब्यात घेतली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या सरकारने शरणागती पत्करली. अन्य महत्त्वाची शहरे तालिबान्यांनी आधीच  ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासमोर फारसे पर्याय शिल्लक नव्हते. 
दुपारनंतर तालिबानी बंडखोरांनी काबुलमध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तानच्या सेनेने पांढरे कपडे घालून शरणागती पत्करली. सत्ता परिवर्तन सुरळीतपणे पार पडल्यास हानी पोहोचविण्यात येणार नाही, अशी भूमिका तालिबानने घेतली आहे. 
तालिबानने दहा दिवसांत मजार-ए-शरीफ, जलालाबादचा ताबा घेतला. मजार-ए-शरीफ हे तालिबानविरोधी शहर मानले जाते. त्यानंतर जलालाबाद  या शहराचा ताबा प्रतिकार न करता तालिबानला मिळाला. भारताने या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली नसून सध्या तेथे अडकलेल्या भारतीयांना सोडविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. 

जलालींकडे सत्ता
तालिबानचा नेता मुल्ला बरादर याच्याशी बोलल्यावर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. अली अहमद जलाली याच्याकडे सत्ता सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.

एअर इंडियाच्या विमानाच्या तासभर घिरट्या
काबुलमधून भारतीय दूतावासातील कर्मचारी व इतर नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान पाठविण्यात आले होते. मात्र, ते काबुलमध्ये दाखल होण्यापूर्वीच परिस्थिती बदलली. 
विमानतळावर एटीसीचे कर्मचारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे विमान तब्बल एक तास काबुलच्या विमानतळाजवळ घिरट्या घालत होते. सुरक्षेसाठी वैमानिकांनी काही काळासाठी विमानाचे रडारही बंद केले होते. अखेर विमान उतरविण्यात आले. दूतावासातील सर्व कर्मचारी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांना घेऊन विमान मायदेशी परतले. 

दूतावासातील कर्मचाऱ्यांना अमेरिकेने केले एअरलिफ्ट 
तालिबानने काबुलमध्ये प्रवेश करताच अमेरिकेने दूतावासातील कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट केले. त्यापूर्वी सर्व संवेदनशील माहिती डिलीट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. 
अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघारी सुरू केल्यानंतर तालिबानने हळूहळू भूभाग ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ११ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण सैन्य माघारी होईल, असे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी यापूर्वीच सांगितले आहे. 

बदला घ्यायचा नाही
तालिबानी प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. सरकार आणि लष्करात सेवा देणाऱ्यांना माफ करण्यात येईल. 
नागरिकांनी घाबरू नये. कोणीही भीतीने देश सोडून जाऊ नये, असे आवाहनही केले. 
मात्र, नागरिकांनी भीतीपोटी काबुल सोडण्यास सुरुवात केली असून शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची 
कोंडी झाली आहे.

Web Title: Afghanistan president Ashraf Ghani flees country as Taliban captures Kabul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.