Afghanistan Crisis: १,२५० कोटी रुपये घेऊन पळाले अशरफ घनी! अफगाणिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूनंही घनींसोबत काबुल सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 01:08 PM2021-08-19T13:08:28+5:302021-08-19T13:09:05+5:30
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा मिळवताच राष्ट्रपती अशरफ घनी यांनी काबुलमधून पळ काढला. घनी एका विशेष विमानातून तझाकिस्तानची राजधानी दुशांबे इथं पोहोचले होते.
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवरतालिबान्यांनी कब्जा मिळवताच राष्ट्रपती अशरफ घनी यांनी काबुलमधून पळ काढला. घनी एका विशेष विमानातून तझाकिस्तानची राजधानी दुशांबे इथं पोहोचले होते. पण तेथील सरकारनं त्यांचं विमान उतरविण्यास नकार दिला. मग अफगाणी राष्ट्रपती आपल्या कुटुंबीय आणि एकूण ५१ जणांसोबत संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) पोहोचले. यूएई सरकारनंही अशरफ घनी यांना मानवतेच्या आधारावर आश्रय दिल्याचं अधिकृतरित्या मान्य केलं आहे. (Afghanistan President Ashraf Ghani Left Kabul with family and Mohammad Nabi for UAE)
अशरफ घनी यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू मोहम्मद नबी आणि एनएमए मोहिब देखील यूएईमध्ये आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार घनी यांची पत्नी रुला एफ सद्दाह घनी, मुलगी मरियम आणि मुलगा तारिक घनी देखील त्यांच्यासोबत आहे. घनी एका खासगी विमानानं तब्बल ५१ जणांना सोबत घेऊन यूएईमध्ये पोहोचले आहेत. घनी त्यांच्यासोबत विमानातून तब्बल १६९ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १२५० कोटी रुपये घेऊन पळाले आहेत, असा आरोप केला जात आहे. दरम्यान, त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तालिबानची सत्ता आल्यास आपल्या जीवाला धोका आहे म्हणूनच अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अशरफ घनींनी शेअर केला व्हिडिओ
अशरफ घनी यांनी बुधवारी रात्री त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी यूएईमध्ये असल्याचं सांगितलं आहे. काबुल सोडण्याच्या निर्णयावर त्यांनी स्पष्टीकरण व्हिडिओतून दिलं आहे. अफगाणिस्तानात रक्तरंजित थरार रोखण्यासाठी मी तिथून निघणं योग्य होतं. माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असं अशरफ घनी म्हणाले. दरम्यान, तझाकिस्तानातील अफगाणिस्तानच्या राजदूतानं घनींवर केलेल्या आरोपांचंही त्यांनी खंडन केलं. राजकोषातून तब्बल १६९ मिलियन डॉलर घेऊन घनींनी काबुल सोडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.