Afghanistan Taliban: “कुठल्याही किंमतीत झुकणार नाही”; पंजशीरमधल्या वाघाची तालिबानींविरोधात डरकाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 07:16 PM2021-08-23T19:16:50+5:302021-08-23T19:24:49+5:30

तालिबानने अहमद मसूदला सरेंडर करण्यासाठी ४ तासांचा वेळ दिला आहे. परंतु शरण जाण्यास मसूदनं नकार दिला आहे.

Afghanistan-Taliban Crisis: Ahmad massoud says he will not surrender | Afghanistan Taliban: “कुठल्याही किंमतीत झुकणार नाही”; पंजशीरमधल्या वाघाची तालिबानींविरोधात डरकाळी

Afghanistan Taliban: “कुठल्याही किंमतीत झुकणार नाही”; पंजशीरमधल्या वाघाची तालिबानींविरोधात डरकाळी

Next

काबुल – अफगाणिस्तानातील(Afghanistan) ३४ प्रांतापैकी ३३ प्रांतावर तालिबाननं(Taliban) पूर्णपणे कब्जा केला आहे. केवळ पंजशीर एकमेव प्रांतावर अद्याप तालिबान कब्जा करू शकलं नाही. परंतु याठिकाणीही तालिबानींनी कूच केली आहे. मागील काही दिवसांत तालिबानींचे अनेक दहशतवादी पंजशीरला पोहचले आहेत. पंजशीरचा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमद मसूदनं तालिबानींना तगडी टक्कर दिली आहे. मसूद आणि अफगाणिस्तानला स्वत:चा राष्ट्रपती घोषित करणारे अमरुल्ला सालेह तालिबानविरोधात रणनीती आखत आहेत.

तालिबानने अहमद मसूदला सरेंडर करण्यासाठी ४ तासांचा वेळ दिला आहे. परंतु शरण जाण्यास मसूदनं नकार दिला आहे. तालिबानने मसूदला ४ तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतर मसूद म्हणाला की, तो तालिबानींसमोर झुकणार नाही. आम्ही सेव्हियत संघाशी टक्कर घेतली होती आता तालिबानींशी टक्कर घेत आहोत. मसूदचे वडील अहमद शाह मसूद हेदेखील अफगाणिस्तानातील तालिबानीविरोधात नेते होते. त्यांनी सेव्हियत संघ आणि तालिबानींविरोधात नेहमी लढाई केली आहे. तालिबान आणि अलकायदाने कट रचून अहमद शाह मसूद यांना ९/११ हल्ल्याआधी मारुन टाकलं होतं. त्यानंतर त्यांचा मुलगा अहमद मसूद आता तालिबानला संपवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहे.

पंजशीरच्या लोकांची मसूदला साथ

मसूदला पंजशीरमध्ये राहणाऱ्या लोकांची साथ मिळत आहे. अहमद मसूदचं म्हणणं आहे की, तालिबानला विरोध करणारे सरकारी दल आणि विविध प्रांतांतील लोकांनी पंजशीर घाटीला किल्ला बनवलं आहे. जर तालिबानसोबत चर्चा अयशस्वी झाली तर युद्ध होण्यापासून कुठल्याही किंमतीत रोखलं जाऊ शकत नाही. पंजशीर प्रांतात जवळपास १० हजार सैन्य तैनात आहे. जे तालिबानी दहशतवाद्यांविरोधात पूर्ण ताकदीनं लढण्यास तयार आहेत.

पंजशीरला तालिबानींचा घेराव, चर्चा सुरू - तालिबान

दरम्यान, तालिबानने दावा केलाय की, त्यांच्या लोकांनी पंजशीर घाटीला चहुबाजूने घेरलं आहे. चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्याचसोबत अहमद मसूदला आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केले आहे. एकीकडे अफगाणिस्तानात परिस्थिती चिघळत आहे. अफगाणिस्तानातील मोठी लोकसंख्या तालिबानवर विश्वास ठेवण्यास तयार नाही. काबुल एअरपोर्टवर दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. जितक्या शक्य आहे तितक्या लवकर तालिबानच्या जाचातून सुटका व्हावी यासाठी लोक प्रयत्नशील आहेत. तालिबान अफगाणिस्तानातील नागरिकांना रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.

Web Title: Afghanistan-Taliban Crisis: Ahmad massoud says he will not surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.