Afghanistan Blast: अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट, १०० जण ठार; आत्मघाती हल्लेखोरानं शियापंथीयांंना केलं टार्गेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 05:43 AM2021-10-09T05:43:48+5:302021-10-09T05:45:19+5:30
Bomb Blast in Afghanistan: तालिबानींनी त्या देशावर कब्जा केल्यानंतर तेथील स्थिती अधिकच बिघडली आहे. त्यात आता नागरिकांवरच हल्ले होत असल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
काबूल : अफगाणिस्तानातील कुंदूझ येथे शियापंथीयांच्या मशिदीत शुक्रवारी घडविण्यात आलेल्या बाॅम्बस्फोटात सुमारे १०० जण ठार किंवा जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.
याआधी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये अशाप्रकारचे हल्ले, बॉम्बस्फोट घडविले आहेत. मात्र, त्या संघटनेने शुक्रवारच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. कुंदूझ येथे शुक्रवारी मशिदीत नमाज पठणासाठी भाविक जमलेले असताना हा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. अफगाणिस्तानात शियापंथीय अल्पसंख्याक आहेत. तालिबानींनी त्या देशावर कब्जा केल्यानंतर तेथील स्थिती अधिकच बिघडली आहे. त्यात आता नागरिकांवरच हल्ले होत असल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
कुंदूज प्रांताचे पोलीस उपप्रमुख दोस्त मोहम्मद ओबैदा म्हणाले की, मशिदीत असलेल्या भाविकांपैकी बहुसंख्य लोक बॉम्बस्फोटात ठार झाले आहेत. आत्मघाती हल्लेखोरामार्फत हा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. सर्वांच्या रक्षणासाठी तालिबान सरकार योग्य उपाययोजना करणार आहे.
हिंसक घटनांमध्ये वाढ
अफगाणिस्तानमध्ये याआधी २६ ऑगस्टला काबूल विमानतळावर घडविलेल्या बॉम्बस्फोटात १६९ अफगाणी नागरिक व १३ अमेरिकी सैनिक ठार झाले होते. त्यानंतर सर्वांत मोठी प्राणहानी शुक्रवारी शियापंथीयांच्या मशिदीत घडविलेल्या बाॅम्बस्फोटात झाली आहे.