Afghanistan Crisis : काबुल विमानतळावर उपासमारीचे संकट; 3000 रुपयांना पाण्याची बाटली तर 7500 रुपयांना जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 09:34 AM2021-08-26T09:34:03+5:302021-08-26T09:43:38+5:30
Afghanistan Crisis : काबुल विमानतळावर जेवण आणि पाण्याचे दर गगनाला भिडले आहेत.
काबुल : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यापासून या देशात सर्व काही बदलले आहे. येथील जास्तीत जास्त लोकांना कसेही करून देश सोडायचा आहे. अफगाणिस्तानमधून बाहेर जाण्याचा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे काबुल विमानतळ (Kabul Airport). येथील सुरक्षा अमेरिकन सैनिकांची आहे. काबुल विमानतळावर अफगाणिस्तान सोडू इच्छिणाऱ्या जवळपास अडीच लाख लोकांची गर्दी आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, भुकेने व्याकुळ असलेल्या लोकांना विमानतळावरच आपला जीव गमवावा लागत आहे.
दरम्यान, काबुल विमानतळावर जेवण आणि पाण्याचे दर गगनाला भिडले आहेत. याठिकाणी ४० डॉलर्स म्हणजेच ३,००० रुपयांना पाण्याची बाटली मिळत आहे. तर जेवणाच्या एका प्लेटसाठी १०० डॉलर्स म्हणजेच ७५०० रुपये खर्च करावे लागत आहेत. या विमानतळावर जे काही पाणी किंवा अन्न विकत घ्यायचे, त्यासाठी अफगाणिस्तानचे चलन घेतले जात नाही. तर फक्त डॉलर्समध्ये पेमेंट स्वीकारले जात आहे. त्यामुळे अफगाणी नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
विमानतळावर पोहोचण्यास ५ ते ६ दिवसांचा कालावधी
अफगाणिस्तानातील लोकांचे म्हणणे आहे की, काबूलमधील घरातून विमानतळावर पोहोचण्यास ५ ते ६ दिवस लागले. कारण, शहरातून विमानतळापर्यंत तालिबान्यांचा पहारा आहे. तालिबानच्या गोळीबारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि हजारो लोकांची गर्दी ओलांडून विमानतळाच्या आत जाणे कठीण आहे. विमानतळाच्या आत गेलात तरी विमान मिळण्यास पाच ते सहा दिवस लागतात. फक्त बिस्किटं आणि मिठाई यावर दिवस काढावे लागत आहेत. खाण्या-पिण्याच्या या किंमतीमुळे अडचणीत भर पडली आहे. अफगाणिस्तानची स्थिती अशी आहे की अनेक मुले पालकांशिवाय अफगाणिस्तान सोडत आहेत.
आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू
जेवण आणि पाण्याच्या वाढत्या किंमतीमुळे लोकांना भुकेल्या पोटावर उन्हात उभे राहण्यास भाग पडत आहे. त्यामुळे या लोकांचे शरीर कमकुवत होत असून आणि ते बेशुद्ध पडत आहेत. लोकांना मदत करण्याऐवजी तालिबान त्यांना घाबरवत आहे. मारहाण करत आहे. काबुल विमानतळाबाहेर झालेल्या गोंधळात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.
८२,३०० लोकांना बाहेर काढण्यात आले
आतापर्यंत काबुलमधून ८२,३०० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. काबुलमध्ये सुमारे ६,००० अमेरिकन आढळले आहेत. त्यापैकी ४५०० लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तालिबानने अलीकडेच म्हटले आहे की, जर अमेरिकेने ३१ ऑगस्टपर्यंत आपले अभियान थांबविले नाही, तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात.
विमानतळाकडे जाणारे रस्ते अडविले
तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी विमानतळाकडे जाणारे रस्ते अडवले आहेत. अफगाण नागरिकांना आता विमानतळावर जाता येणार नाही. त्या रस्त्यावरून विमानतळापर्यंत केवळ परदेशी नागरिकांनाच प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. तसेच, यापूर्वी काबुल विमानतळावर असलेल्या सर्व अफगाण नागरिकांनी घरी परतावे. अशा लोकांना तालिबानकडून शिक्षा होणार नाही, असेही ते म्हणाले.