Afghanistan Taliban Crisis : हृदयद्रावक! "तालिबानींनी माझं अपहरण केलं, डोक्यात गोळ्या झाडल्या आणि नंतर काढले डोळे"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 03:25 PM2021-09-05T15:25:34+5:302021-09-05T15:37:34+5:30

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एका अफगाणी स्त्रीची मन सुन्न करणारी गोष्ट समोर आली आहे. 

Afghanistan Taliban Crisis taliban kidnapped me shot me in head and took out my eyes says afghan woman | Afghanistan Taliban Crisis : हृदयद्रावक! "तालिबानींनी माझं अपहरण केलं, डोक्यात गोळ्या झाडल्या आणि नंतर काढले डोळे"

Afghanistan Taliban Crisis : हृदयद्रावक! "तालिबानींनी माझं अपहरण केलं, डोक्यात गोळ्या झाडल्या आणि नंतर काढले डोळे"

Next

नवी दिल्ली - तालिबाननेअफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला. राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींनी संसद, राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ माजली. अफगाणिस्तानमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. तालिबान कशाप्रकारे अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एका अफगाणी स्त्रीची मन सुन्न करणारी गोष्ट समोर आली आहे. 

अफगाणिस्तानमध्ये पोलीस खात्यात सेवा बजावलेल्या महिलेने तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिली आहे. खातेरा हाशिमा असं य़ा महिलेचं नाव आहे. "तालिबान अजिबात बदलला नाही, अगदी 20 वर्षांपूर्वी होता तसाच आहे. मी गर्भवती असताना देखील तालिबान्यांनी माझे अपहरण केले होते. त्यानंतर अत्याचार करत माझ्या डोक्यात गोळ्या झाडल्या गेल्या आणि माझे डोळे बाहेर काढण्यात आले" अशी धक्कादायक माहिती खातेरा यांनी दिली आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही महिलेचे घराबाहेर पडणे तालिबानच्या नजरेत पाप आहे. जे खातेरा यांच्यासोबत घडले ते तिथल्या अनेक महिलांसोबत घडत आहे. त्या महिला बाहेर येऊ शकत नाहीत, कोणाला काही सांगू शकत नाहीत असं देखील खातेरा हाशिमा यांनी सांगितले. 

इस्लामच्या नावाखाली तालिबान अफगाणी लोकांना धमकावतं

खातेरा सध्या भारतात आहेत पण अफगाणिस्तानमध्ये झालेल्या अत्याचाराबाबत सांगतांना त्यांचा अंगावर काटा उभा राहिला. इस्लामच्या नावाखाली तालिबान अफगाणी लोकांना धमकावत आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे. खातेरा यांना त्यांच्या वडिलांनी अफगाण पोलिसात सामिल होण्यापासून रोखले होते. खातेरा यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना समजलं की तिचे वडील तालिबानशी संलग्न आहेत. तिच्या वडिलांना खातेरावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती होती. पण त्यांनी तिला वाचवले नाही. त्यामुळे मला वडिलांकडूनच धोका मिळाल्याचे खातेरा हाशिमा यांनी म्हटलं आहे. 

 

"डोक्यात गोळ्या झाडल्या, डोळे काढले"

खातेरा एक दिवस जेव्हा त्या कामावरून परत येत होत्या, तेव्हा तीन तालिबानी घराजवळ तिची वाट पाहत होते. त्यांनी हल्ला केला, चाकूने आठ ते दहा वेळा वार केले आणि गोळ्या झाडल्या. डोक्यात एक गोळी लागल्याने खातेरा बेशुद्ध झाल्या. त्यानंतरही तालिबान्यांनी क्रूरता दाखवली आणि त्यांनी खातराचे डोळे काढले. खातेरा यांनी या हल्ल्यानंतर त्या जिवंत मृतदेह बनल्याचं म्हटलं आहे. हल्यानंतर त्यांना काबुलच्या एका रुग्णालयात नेण्यात आले होते. जेथे डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवला. पण त्यांची दृष्टी कायमची गेली आहे. आज मी श्वास घेत आहे, पण एकेक दिवस घालवणं माझ्यासाठी संघर्षापेक्षा कमी नाही. दैनंदिन आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी करणे सुद्धा माझ्यासाठी एक आव्हान आहे असं खातेरा यांनी म्हटलं आहे. 

"तालिबानी मुलांना धमकी देत आहेत"

खातेरा हाशिमा यांना चांगल्या उपचारासाठी भारतात आणले होते. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती बिकट होत गेली. त्यामुळे त्या इथेच आहे. पण त्यांचे कुटुंब अजूनही अफगाणिस्तानमध्ये आहे. तसेच मला माझ्या मुलांची काळजी आहे, परंतु ती अफगाणिस्तानात परत जाऊ शकत नाही. तालिबानला मी जिवंत असल्याचं कळलं आहे आणि ते मला शोधत आहेत. आजही तालिबानी सतत माझ्या घरी जाऊन आमच्याबाबत माहिती विचारत आहेत. माझ्या मुलांना धमकी देत आहेत असं खातेरा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Afghanistan Taliban Crisis taliban kidnapped me shot me in head and took out my eyes says afghan woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.