अशरफ गनींचं विमान उतरवण्यास ताजिकिस्ताकडून परवानगी नाही; ओमानमार्गे अमेरिकेत जाणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 02:56 PM2021-08-16T14:56:52+5:302021-08-16T14:58:34+5:30
Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी सोडला देश. अशरफ गनी ताजिकिस्तानमध्ये जाणार असल्याची होती माहिती.
अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. परंतु अशा परिस्थितीत अशरफ गनी यांच्या देश सोडल्यानं अनेक नागरिक नाराज झाले आहेत. दरम्यान, गनी हे ताजिकिस्तानमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली होती. परंतु ताजिकिस्ताननं अशरफ गनी यांचं विमान उतरवण्यास परवानगी दिली नाही. यानंतर ते ओमानला रवाना झाले. ओमानवरून ते अमेरिकेत जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अफगाणिस्तानचे सुरक्षा सल्लागार मोहिब हेदेखील त्यांच्यासोबत आहेत.
दरम्यान, अशरफ गनी यांनी आपण का देश सोडला यासंदर्भात माहिती दिली होती. "माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते. तालिबानने मला हटवले आहे. काबुलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असं गनी यांनी म्हटलं आहे.
काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतं.
"मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असं घनी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.