‘आफ्रिका विकास पथावर’
By admin | Published: July 26, 2015 03:55 AM2015-07-26T03:55:10+5:302015-07-26T03:55:10+5:30
भविष्यात आफ्रिका जागतिक विकासाचे केंद्र बनावे, अशी आशा व्यक्त करीत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेची आणि व्यावसायिक क्षमतेची प्रशंसा केली.
नैैरोबी : भविष्यात आफ्रिका जागतिक विकासाचे केंद्र बनावे, अशी आशा व्यक्त करीत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेची आणि व्यावसायिक क्षमतेची प्रशंसा केली.
अमेरिका पुरस्कृत व्यावसायिक परिषदेचे उद्घाटन करताना ओबामा म्हणाले की, आफ्रिका विकासाच्या मार्गाने पुढे जात असून आफ्रिका खंड बदलत आहे. येथील दरडोई उत्पन्न वाढत आहे. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत नैरोबी खूप बदलल्याची दिसते, असेही ते म्हणाले.
गरिबी कमी होत आहे आणि मध्यमवर्गीयांची संख्या वाढत आहे, असे ओबामा जागतिक उद्योजक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले.
१९९८ मध्ये येथील अमेरिकी दूतावासावरील बॉम्बहल्ल्यात ठार झालेल्यांच्या स्मारकालाही ओबामा यांनी भेट दिली. केनिया भेटीत ते केनियाचे अध्यक्ष उहूरू केनियाट्टा यांच्याशी सुरक्षेबाबत, तसेच अल-शबाब या संघटनेच्या धोक्याबाबतही चर्चा करणार आहेत. ओबामा यांनी जागतिक उद्योजक परिषदेत अमेरिका सरकार, अमेरिकन बँक आणि देणगीदारांच्या वतीने केनियाला १ अब्ज डॉलरच्या मदतीची घोषणा केला. यापैकी निम्मी रक्कम नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्या महिला आणि युवकांसाठी वापरली जाईल.
२०१० मध्ये ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये जागतिक उद्योजक परिषदेचे उद्घाटन केले होते. यावर्षी पहिल्यांदा उप-सहारा आफ्रिकेत ही परिषद होत आहे. (वृत्तसंस्था)