ती आई होती म्हणुनी...; तब्बल 34 दिवसांनंतर जंगलात भरकटलेल्या तीन मुलांची मातेसह सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 10:01 IST2020-01-29T09:57:08+5:302020-01-29T10:01:47+5:30
कोलंबियातील जंगल सफरीवर गेलेले एक कुटुंब घनदाट जंगलामध्ये रस्ता चुकले आणि हरवले.

ती आई होती म्हणुनी...; तब्बल 34 दिवसांनंतर जंगलात भरकटलेल्या तीन मुलांची मातेसह सुटका
बोगोटा : कोलंबियातीलजंगल सफरीवर गेलेले एक कुटुंब घनदाट जंगलामध्ये रस्ता चुकले आणि हरवले. त्यांना तब्बल 34 दिवसांनी कोलंबियाच्या नौदलाने शोधले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या 34 दिवसांत या 40 वर्षांची महिला आणि तिच्या तीन मुलांनी जिवंत राहण्यासाठी मोठा संघर्ष केला.
नौदलाचे कमांडर जनरल सर्जियो अल्फ्रेडो सेरानो यांनी सांगितले की, ही महिला आणि तिची तीन मुले 19 डिसेंबरला सुट्टी साजरी करण्यासाठी जंगल सफरीवर गेले होते. मुलांचे वय 14, 12 आणि 10 वर्षे आहे. मात्र, रात्र झाल्याने ते रस्ता चुकले आणि कोलंबिया-पेरू सीमेवर हरवले.
Una madre y sus tres hijos pasaron más de un mes perdidos en el Amazonas - https://t.co/6i7ID6Be72pic.twitter.com/Kdy43PXnmH
— Noticias Caracol (@NoticiasCaracol) January 27, 2020
यानंतर त्यांचा वाट शोधण्याबरोबरच जिवंत राहण्यासाठी संघर्ष सुरू झाला. जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्याबरोबरच थंडी, वारा, उन अशा संकटांत 34 दिवस त्यांनी कसेबसे काढले. भूक भागविण्यासाठी जांभळांचा आधार मिळाला. अनवाणी जंगलामध्ये वाट शोधत भटकत राहिले. प्राण्यांपासून वाचण्यासाठी तीन मुलांसह ती आई झाडांवर आश्रय घेत होती. या मातेने तिच्या तीन मुलांना वाचविण्यासाठी अहोरात्र केलेली धडपड खरंच धाडसी आहे. या सगळ्या प्रयत्नांमध्ये त्या पेरुची सीमाही पार केली होती.
त्यांच्यासोबत गेलेल्या पर्यटकांच्या चमून परतल्यावर याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर त्यांना शोधण्याची मोहिम सुरू केली होती.