अपघाती मृत्यूनंतर नेताजींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
By admin | Published: January 22, 2016 02:44 AM2016-01-22T02:44:01+5:302016-01-22T02:44:01+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अखेरच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ब्रिटनच्या एका वेबसाईटने तैवानच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने नवा दावा केला आहे
लंडन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अखेरच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ब्रिटनच्या एका वेबसाईटने तैवानच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने नवा दावा केला आहे. यानुसार १८ आॅगस्ट १९४५ च्या विमान अपघातानंतर नेताजींच्या पार्थिवावर २२ आॅगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
तैवानच्या अधिकाऱ्याने याबाबत पुरावे दिले असल्याचा दावा या वेबसाईटने केला आहे. हे पुरावे १९५६ मध्ये देण्यात आले होते आणि यूके फॉरेन आॅफिस फाईल नंबर एफसी १८५२ मध्ये ठेवण्यात आले आहेत, असेही यात म्हटले आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी जी सरकारी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली त्याचे प्रभारी असलेले तान ती-ती यांनी नेताजींच्या अंत्यसंस्काराबाबतचे सर्वच वादविवाद फेटाळून लावले आहेत. मृतदेह घेऊन आलेल्या एका जपानी अधिकाऱ्याने ती-ती यांना सांगितले की, हा मृतदेह भारतातील नेते सुभाषचंद्र बोस यांचा आहे. टोकियोकडे जाताना विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले होते.