ब्रेक्झिटनंतर... फ्रेक्झिट, ऑक्झिट आणि नेक्झिट?
By admin | Published: June 24, 2016 02:43 PM2016-06-24T14:43:27+5:302016-06-24T14:43:27+5:30
ब्रिटनच्या जनतेने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय सार्वमताद्वारे घेतल्याचा परिणाम युरोपमधल्या अन्य देशांवरही होईल अशी चर्चा आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
पॅरीस, दि. 24 - ब्रिटनच्या जनतेने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय सार्वमताद्वारे घेतल्याचा परिणाम युरोपमधल्या अन्य देशांवरही होईल अशी चर्चा आहे. किमान फ्रान्स, ऑस्ट्रिया आणि नेदरलँड्स या देशातील जनता सार्वमत घेऊन युरोपीय महासंघातून एक्झिट घेण्याचा विचार करत असल्याचे वृत्त युरोपमधल्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहे.
एका पाहणीनुसार ऑस्ट्रियामधल्या 40 टक्के जनतेची ब्रेक्झिटच्या धर्तीवर युरोपीय महासंघात रहायचे की नाही यावर सार्वमत घेण्याची मागणी आहे.
ऑस्ट्रियन्सही बदलतायंत
ऑस्ट्रियातल्या लोकांची महासंघात राहण्याबाबत काय भूमिका आहे, हे जाणुन घेण्यासाठी सार्वमत घ्यायला हवं असं मत ऑस्ट्रियामधल्या ईयू एक्झिट पार्टीचे नेते रॉबर्ट मार्शल यांनी नुकतेच व्यक्त केले होते. ऑस्ट्रियामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये जनतेच्या मानसिकतेत बदल झाला असून जसा काळ जातोय, त्याप्रमाणे महासंघातून बाहेर पडण्याकडे कल वाढत असल्याचे पाहण्यांमधून दिसून येत आहे.
प्रत्येक देशातल्या जनतेला मताचा अधिकार हवा - फ्रान्समधील नेते
फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी आणि स्वीडन या देशांमध्ये नुकतीच एक जनमत चाचणी घेण्यात आली. यामध्ये ब्रिटन जर युरोपीय महासंघातून बाहेर पडला तर सार्वमत घेण्याकडे लोकांचा कल दिसून आला. फ्रान्समधले उजव्या विचारसरणीचे नेते मरीन ले पेन यांनी फ्रेक्झिटची मागणीच केली आहे. युरोपीय महासंघातील प्रत्येक देशाच्या नागरिकाला मत व्यक्त करण्याची संधी मिळायला हवी असं मत पेन यांनी व्यक्त केलं आहे.
53 टक्के डच म्हणतात, सार्वमत घ्या
नेदरलँडमधल्या 53 टक्के लोकांनी महासंघातून बाहेर पडण्यास अनुकूल मत दिल्याचे एका पाहणीत आढळलं आहे.
ब्रेक्झिट हे राष्ट्रभक्तीचं प्रतीक असल्याचं मानण्यात येत असून अन्य देशांनीही राष्ट्रभक्ती दाखवावी असा प्रचार एक्झिटचे पुरस्कर्ते करत आहेत. जर ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडला तर आपल्या देशातही येत्या वर्षांमध्ये यावर चर्चा झडतिल असे निरीक्षण झेक रिपब्लिकचे पंतप्रधान बोहुस्लाव सोबोत्का यांनी नोंदवलं आहे.
गेल्या महिन्यात केलेल्या एका पाहणीमध्ये 53 टक्के इटालियन्स आणि 38 टक्के हंगेरियन्सनी सार्वमताच्या बाजुने कौल दिल्याचे आढळले होते.