चिन्मय दास यांच्यानंतर बांगलादेशात आणखी एका हिंदू पुजाऱ्याला अटक; वॉरंटशिवाय केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 06:24 PM2024-11-30T18:24:45+5:302024-11-30T18:25:13+5:30
चिन्मय दास यांच्यानंतर आणखी एका हिंदू नेत्याला बांगलादेशात अटक केल्याची माहिती इस्कॉनने दिली आहे.
Bangladesh: बांगलादेशातीलहिंदू समुदायावर सुरू असलेले हल्ले आणि दडपशाही अद्यापही सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. आणखी एका हिंदू पुजाऱ्याला बांगलादेशात अटक करण्यात आली आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) ने याची पुष्टी केली आहे. श्याम दास प्रभू असे अटक केलेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. श्याम दास प्रभू हे तुरुंगात असलेले अध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांना भेटायला गेले होते.
बांगलादेशातील इस्कॉनचे पुजारी चिन्मय कृष्ण दास यांना अटक केल्यानंतर आता शनिवारी चितगाव येथे आणखी एका हिंदू पुजाऱ्याला अटक करण्यात आल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. शाम दास प्रभू यांना कोणत्याही अधिकृत वॉरंटशिवाय अटक करण्यात आली आहे. कोलकाता स्थित इस्कॉनचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी ही माहिती दिली आहे. या घटनेनंतर हिंदू समाज आणि धार्मिक संघटनांमध्ये तीव्र संताप आहे.
बांगलादेश पोलिसांनी सोमवारी चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना ढाक्यातील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना जामीन नाकारण्यात आला. त्यांच्या अटकेनंतर बांगलादेशची राजधानी ढाका आणि चितगावसह अनेक ठिकाणी हिंदू समुदायाच्या सदस्यांनी निदर्शने सुरू केली आहेत. बांगलादेशी पोलिसांकडून ही आंदोलने दडपण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा वापर केला जात आहे.
चिन्मय कृष्ण दास यांना जामीन नाकारण्यात आल्यानंतर मंगळवारी चितगाव येथील न्यायालयाबाहेर पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात एका वकिलाचा मृत्यू झाला. सहायक सरकारी वकील सैफुल इस्लाम यांच्या हत्येप्रकरणी किमान नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ४६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, त्यापैकी बहुतांश अल्पसंख्याक हिंदू समाजातील स्वच्छता कर्मचारी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
इस्कॉन आणि इतर हिंदू संघटनांनी या दडपशाहीचा तीव्र निषेध केला आहे. राधारमण दास म्हणाले की ही कारवाई अल्पसंख्याक हिंदू समुदायाला धमकावण्याचा आणि धार्मिक स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी बांगलादेश सरकारकडे अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची खात्री करून या घटनांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत आणि त्यांच्या समर्थनार्थ जागतिक जनमत तयार करण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक ती पावले उचलावीत असं आवाहन केलं आहे.