कॅनरा बँकेकडून अखेर वादग्रस्त भरती अर्ज मागे
By admin | Published: July 14, 2014 12:39 AM2014-07-14T00:39:06+5:302014-07-14T00:39:06+5:30
उमेदवाराची खासगी वैद्यकीय माहिती भरणे आवश्यक असलेला वादग्रस्त भरती अर्ज कॅनरा बँकेने मागे घेतला आहे.
चेन्नई : उमेदवाराची खासगी वैद्यकीय माहिती भरणे आवश्यक असलेला वादग्रस्त भरती अर्ज कॅनरा बँकेने मागे घेतला आहे. कॅनरा बँकेतील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून खासगी वैद्यकीय माहिती मागविण्यात आली होती. यामध्ये महिला उमेदवारांना मासिक पाळीचा इतिहास, छातीचा आकार व गर्भधारणेविषयीचा पुरावा मागविला होता. यावरून वाद निर्माण झाल्याने बँकेने तो अर्ज मागे घेतला आहे. देशभरातील बँक संघटनांनी निदर्शने केल्यानंतर कॅनरा बँकेने पाच पानांचा ‘मेडिकल फार्म’ मागे घेतला आहे.
वैयक्तिक इतिहासाचा नमुना रोखण्यात आला आहे. रुजू होणाऱ्या उमेदवारांना प्रश्नावलीचा नमुना सादर करण्याची आवश्यकता नाही, असे बँकेच्या निवेदनात म्हटले आहे. लेखी परीक्षा व मुलाखत दिलेल्या उमेदवारांचा अपमान आहे. वैद्यकीय तपासणी एक साधी औपचारिकता होती. पण तिसऱ्या फेरीत ती स्क्रिनिंग टेस्ट करण्यात आली, असे भारतीय बँक एम्प्लाईज फेडरेशनचे (तामिळनाडू) सरचिटणीस सी. पी. क्रिष्णन म्हणाले. उमेदवार गरोदर आढळल्यास वैद्यकीय अधिकारी त्या उमेदवाराची लगेच नियुक्ती रोखू शकत होते. मानवी हक्कांचे उल्लंघन आणि लिंगभेद असल्याचे सांगून संघटनांचे कर्मचारी व कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केला होता. याशिवाय किडनीचा आजार, हृदयविकार, मधुमेह, एचआयव्ही आणि कर्करोग असल्यास उमेदवार नोकरीसाठी अपात्र ठरविला जाऊ शकत होता.
हे निश्चितच कायदाविरोधी आहे. हे कायद्यासमोर सर्व समान आणि कायद्याचे सर्वांना समान संरक्षण या घटनेतील तरतुदीविरुद्ध आणि असंवेदनशीलदेखील आहे. एखाद्या महिलेला लिंग किंवा तिच्या प्रजननक्षमता किंवा अन्य कारणाने किंवा एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही किंवा इतर कारणाने भेदाभेद केला जाऊ शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाचे वकील सुधा रामालिंगम म्हणाल्या. (वृत्तसंस्था)