१३२ विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर पेशावरमधील 'थरार' संपला
By admin | Published: December 16, 2014 12:58 PM2014-12-16T12:58:53+5:302014-12-16T18:56:25+5:30
पाकिस्तानमधील पेशावर येथील एका लष्करी शाळेवर ६ ते ७ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १३२ निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर ७ तासांनंतर हा थरार संपुष्टात आला.
Next
ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि. १६ - माणुसकीला काळिमा फासणा-या पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांनी आता लहान मुलांनाही सोडले नसून पेशावरमधल्या लष्करी शाळेत आत्मघातकी हल्ला केला आहे. शेकडो मुलं शिकत असलेल्या शाळेमध्ये सुमारे सात दहशतवादी घुसले असून आत्तापर्यंत त्यांनी १३२ निष्पाप विद्यार्थ्यांना ठार केले असल्याचे लष्करी अधिका-यांनी सांगितले. त्यात एक शिक्षक व जवानाचाही समावेश आहे. सिडनीतली घटना ताजी असतानाच इतका मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानात घडला असल्यामुळे इस्लामी दहशतवाद्यांच्या वाढलेल्या धोक्याची कल्पना येत आहे.
मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांसह लष्करी शाळेवर आत्मघातकी हल्ला चढवला. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली असून या परीसरामध्ये केवळ बंदुकांचेच नाही तर बाँबस्फोटांचेही आवाज ऐकायला येत आहेत.
तहरीक- ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने या दहशतवादी कृत्चेयाची जबाबदारी घेतली असून पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सुमारे १५०० विद्यार्थी व शिक्षकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलातील जवानांनी शाळेला चारही बाजूंनी वेढा घातला असून दहशतवाद्यांसोबत त्यांची चकमक सुरू होती.
या हल्ल्यात जवळपास ४० विद्यार्थी जखमी झाले असून सुमारे १५ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामधून जीव बचावलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार शेकडो विद्यार्थ्यांना ऑडिटोरियममध्ये बसवण्यात आले आहे. त्यांचा जीवही धोक्यात आहे. दहशतवादी शाळेच्या आवारात बाँबस्फोटही करत असून विद्यार्थ्यांच्या नक्की स्थितीचा अंदाज येत नसल्याचे समजते. पाकिस्तानचे सुरक्षा दलाचे जवान विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी निकराचे प्रयत्न करत आहेत.