चार दशकांनंतर राजघराण्याला मिळाला 'वारस'; या शाही राजघराण्यात सध्या फक्त ४ पुरुष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 07:56 AM2024-09-12T07:56:49+5:302024-09-12T07:57:33+5:30

राजकुमार हिसाहितो या राजघराण्यातील सगळ्यांत युवा सदस्य आहे. १७ सदस्य असलेल्या या शाही राजघराण्यात सध्या फक्त चार पुरुष आहेत.

After four decades, Prince Hisahito becomes the first royal male in Japan | चार दशकांनंतर राजघराण्याला मिळाला 'वारस'; या शाही राजघराण्यात सध्या फक्त ४ पुरुष

चार दशकांनंतर राजघराण्याला मिळाला 'वारस'; या शाही राजघराण्यात सध्या फक्त ४ पुरुष

जगात अनेक देशांत आजही राजेशाही अस्तित्वात आहे आणि त्यांना त्याचं महत्त्वही आहे. बऱ्याच देशांत लोकशाही अस्तित्वात आली असली तरी त्याचबरोबर राजेशाहीदेखील तिथे टिकून आहे. अर्थात अशा देशांत लोकशाहीच्या तुलनेत राजेशाहीला दुय्यम महत्त्व असलं तरी त्यांचा शाही मान मात्र कमी झालेला नाही. ब्रिटनचं राजघराणं हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे.

ब्रिटनमधील राजघराण्याबद्दल केवळ त्या देशातील लोकांनाच आदर नाही, तर या राजघराण्यात काय चाललंय याकडे अख्ख्या जगाचं लक्ष असतं आणि जगभरातील सर्वसामान्य लोक या राजघराण्यातल्या बंद दाराआड काय चाललंय याकडे अतिशय कुतूहलानं बघत असतात. त्यामुळे या राजघराण्यात कुठे खुट्ट जरी झालं, तरी लोक कान टवकारतात आणि त्या गोष्टीला प्रचंड प्रतिसाद मिळतो. असंच एक राजघराणं जपानमध्येही आहे. हे राजघराणंही जपानमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या राजघराण्याविषयी लोकांना अतिशय आदर आहे. या राजघराण्यात नुकतीच एक आनंदाची घटना घडली आहे, त्यामुळे अख्ख्या जपानमध्ये आनंदाची लहर आहे. जपानमध्ये असं झालं तरी काय?

तर तिथे तब्बल चार दशकानंतर राजघराण्यातील कोणी एखादा पुरुष 'प्रौढ' झाला आहे, म्हणजे वयात आला आहे. जपानचं राजघराणं त्यासाठी अक्षरशः आसुसलेलं होतं. कारण या राजघराण्यात त्यांची 'गादी' चालवण्यासाठी कोणी पुरुषच जन्माला येत नव्हता. जपानचे राजकुमार हिसाहितो हे काही दिवसांपूर्वीच १८ वर्षांचे झाले आहेत, ते वयात आले आहेत आणि प्रौढ झाले आहेत. त्यामुळेच राजघराण्यात आणि जपानच्या नागरिकांमध्ये आनंद पसरला आहे. लोकांनी लगेच हा आनंदोत्सव साजरा करायलाही सुरुवात केली आहे. गेल्या चार दशकांत या राजघराण्यानं एकही प्रौढ पुरुष पाहिलेला नाही. राजकुमार हिसाहितो या राजघराण्यातील सगळ्यांत युवा सदस्य आहे. १७ सदस्य असलेल्या या शाही राजघराण्यात सध्या फक्त चार पुरुष आहेत.

राजकुमार हिसाहितो हे जपानचे क्राऊन प्रिन्स अकिशिनो आणि क्राऊन प्रिन्सेस किको यांचे चिरंजीव आहेत. जपानचे सम्राट नारुहितो यांचे ते पुतणे आहेत. सम्राट नारुहितो आणि क्राऊन प्रिन्स अकिशिनो यांच्यानंतर प्रिन्स हिसाहितो हेच जपानच्या या राजघराण्याच्या राजसिंहासनाचे उत्तराधिकारी असतील. गेल्या ३९ वर्षांत या राजघराण्यातील कोणताही पुरुष प्रौढ झाला नव्हता. आपल्या राजघराण्याचा वारसा कसा चालवायचा म्हणून हे राजघराणं अतिशय चिंतित होतं. हिसाहितो यांचे वडील क्राऊन प्रिन्स अकिशिनो हे १९८५मध्ये 'प्रौढ' झाले होते. त्यावेळी त्यांचं वय वीस वर्षे होतं. त्यावेळच्या नियमानुसार राजघराण्यातील व्यक्ती वीस वर्षांची झाल्यावर प्रौढ झाल्याचं मानलं जात होतं. मात्र, त्यानंतर हे वय घटवून १८ वर्षे करण्यात आलं.

या राजघराण्यानं प्रदीर्घ काळ जपानवर राज्य केलं आहे. वाढतं वय, घटती लोकसंख्या आणि तरुणाई ही जपानची सध्या प्रमुख समस्या आहे. याच समस्येनं राजघराण्यालाही घेरलं आहे. प्रिन्स हिसाहितो प्रौढ झाल्याचा अतीव आनंद राजघराण्यालाही झाला असला तरी त्याचा अधिकृत समारंभ पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. प्रिन्स हिसाहितो सध्या त्सुकुबा युनिव्हर्सिटीत सीनियर हायस्कूलमध्ये तिसऱ्या वर्षांचं शिक्षण घेत आहेत. त्यांनी एक अधिकृत पत्र प्रसिद्धीसाठी दिलं असून त्यात त्यांनी म्हटलं आहे, सध्या तरी मी माझ्या शिक्षणावर लक्ष देण्याचं ठरवलं असून त्यात पुढे जायचं माझं लक्ष्य आहे.

हिसाहितोनं आपले आई-वडील आणि बहीण माको कुमुरो यांच्याविषयीही कृतज्ञता व्यक्त केली आहे. लग्नानंतर बहीण माको कोमुरोनं शाही परिवार सोडला होता. पुढच्या वर्षी मार्चमध्ये प्रिन्स हिसाहितो हायस्कूल पासआऊट होतील. त्यामुळेच हा समारंभ पुढे ढकलण्यात आला असून परीक्षा पास झाल्यानंतर हा समारंभ होईल. जपानचा हा शाही परिवार सध्या उत्तराधिकाऱ्याच्या संकटाचा सामना करतो आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, १९६५ ते २००६ या काळात या राजघराण्यात एकाही मुलग्याचा जन्म झालेला नाही. २००६मध्ये प्रिन्स हिसाहितो यांचा जन्म झाला होता. शिवाय ते आता 'प्रौढ' झाल्यामुळे जपानमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे.

फक्त पुरुषांनाच राजसिंहासन !

जपानमध्ये राजसिंहासनाचा अधिकार फक्त पुरुषांकडेच आहे. महिला राजघराण्याची गादी सांभाळू शकत नाहीत. याआधी १७६२ ते १७७१ या काळात साकुरामची या महाराणी होत्या. जपानचे सम्राट नारुहितो यांना आईको नावाची एक मुलगी आहे. १७ सदस्यांच्या परिवारातील पाच राजकन्यांना योग्य वर न मिळाल्यानं त्यांनी विवाह केलेला नाही. राजकुमारीनं सामान्य माणसाशी विवाह केला, तर तिला आपली शाही पदवी सोडावी लागते. 

Web Title: After four decades, Prince Hisahito becomes the first royal male in Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.