आफ्रिकेतील गाम्बियानंतर आता इंडोनेशियात कफ सिरपचा कहर, ९९ मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 05:19 PM2022-10-20T17:19:51+5:302022-10-20T17:20:29+5:30
cough Syrup: आफ्रिकी देश गाम्बियामध्ये भारतातील एक कफ सिरप पिल्याने ६९ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता इंडोनेशियामध्येही तसाच प्रकार उघडकीस आला आहे.
जाकार्ता - आफ्रिकी देश गाम्बियामध्ये भारतातील एक कफ सिरप पिल्याने ६९ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता इंडोनेशियामध्येही तसाच प्रकार उघडकीस आला आहे. येथे ९९ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. इंडोनेशियाने सर्व कफ सिरपच्या औषधांच्या विक्रीला स्थगिती दिली आहे. इंडोनेशियाने दिलेल्या माहितीनुसार काही सिरपमध्ये असे घटक सापडले आहेत जे एक्यूट किडनी इंजरीसाठी जबाबदार असतात. या तत्त्वांमुळे इंडोनेशियामध्ये आतापर्यंत ९९ मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र ही औषधे आयात केलेली होती की त्यांचं उत्पादन स्थानिक पातळीवर झालं होतं, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
इंडोनेशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांनी मुलांध्ये एकेआयची सुमारे २०० प्रकरणांची नोंद केली आहे. त्यामधील बहुतांश पाच वर्षांखालील वयाचे होते. या महिन्याच्या सुरुवातीला डब्ल्यूएचओने चार कफ सिरपबाबत जागतिक अलर्ट जारी केला होता, त्यामुळे हा अलर्टही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. इंडोनेशियाच्या आरोह्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमध्येही हेच रासायनिक संयुग आढळून आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी भारताकडून सांगण्यात आले की, आयात करणारा देश हा सर्वसाधारणपणे औषध बाजारात पाठवण्यापूर्वी त्याची तपासणी करतो. तर हरयाणातील औषध नियंत्रक आणि केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेने मिळून तपासणी सुरू केली आहे. मेडेन फार्माने औषध बनवताना काही आवश्यक पावले उचललेली नाहीत. तसेच अशा घटकांचा वापर केला ज्यांची कालमर्यादा संपली होती.