...अन् इम्रान खान यांच्यावर प्रवासी विमानाने जाण्याची वेळ आली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 09:32 AM2019-09-29T09:32:54+5:302019-09-29T10:13:36+5:30
पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाल्याने इम्रान खान यांच्याकडे स्वत:चे विमान नाही.
न्यूयॉर्क : सौदी अरब सरकारद्वारे गिफ्ट म्हणून दिलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर शनिवारी प्रवासी (कमर्शियल) विमानाने जाण्याची वेळ आली. इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. दौरा आटोपून पाकिस्तानला रवाना होण्यासाठी निघाले असता न्यूयॉर्क विमानतळावर त्यांच्या विमानाने उड्डाण करताच काही तांत्रिण अडचण आली. त्यामुळे विमान इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळ स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजता सौदी एअरलाइन्स विमानाने न्यूयॉर्कहून जेद्दाकडे निघाले. त्यानंतर रविवारी सकाळी जवळपास आठ वाजता जेद्दामध्ये विमानाला तांत्रिक बिघाड झाला. यानंतर आता जेद्दामध्ये काही काळ विश्रांती घेतल्यानंतर इम्रान खान रविवारी संध्याकाळी पाकिस्तानात प्रवासी विमानाने पोहोचणार आहेत.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाल्याने इम्रान खान यांच्याकडे स्वत:चे विमान नाही. यामुळे ते अमेरिकेला प्रवासी विमानाने निघणार होते. मात्र, सौदी अरबचे प्रिन्स यांनी इम्रान खान यांना विशेष अतिथी असल्याचे सांगत आपल्या विमानाने अमेरिकेला नेले.
बेजबाबदार भाषणावरून इम्रान खान यांना भारताने खडेबोल सुनावले
बेजबाबदार भाषणावरून संयुक्त राष्ट्रात भारताच्या सचिव विदीशा मैत्रा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विदिशा मैत्रा यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रात इम्रान खान यांनी केलेल्या भाषणावर उत्तर देताना सांगितले की, इम्रान खान यांनी अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देऊन भारतात अशांतता माजवण्याचा प्रयत्न केला आहे.
इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रात भाषण करून जागतिक मंचाचा दुरुपयोग केला आहे. त्यांनी भारताविषयी केलेला भाष्य पूर्णपणे खोटे आहे. पाकिस्तानात दहशतवादी नाहीत, हे निरीक्षक पाठवून चौकशी करा, असे इम्रान खान म्हणाले होते. मात्र, दहशतवाद्यांना पेन्शन का दिली जाते, हे इम्रान खान सांगू शकतील का, असा सवाल करत विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल चढवला. तसेच, पाकिस्तानने खुलेआम ओसामा बिन लादेनचे समर्थन केले, असेही त्या म्हणाल्या.