परदेशातही दिसली मोदीच्या आवाहनाची जादू, अमेरिकेतील भारतीयांनीही लावल्या दिवे आन् मेणबत्त्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 10:42 AM2020-04-06T10:42:25+5:302020-04-06T11:22:28+5:30
यावेळी अमेरिकेतील काही नागरिकांनी धार्मिक मत्रोच्चार केला तर काहींनी प्रार्थना केली. या शिवाय काही नागरिकांनी तर आपल्या घरात भारत आणि अमेरिकेचा ध्वज टेबलावर ठेवून त्याभोवती दिवे आणि मेणबत्त्या लावल्याचेही बघायला मिळाले.
नवी दिल्ली/न्यू जर्सी -पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या दिवे, मेणबत्त्या आणि टॉर्च लावण्याच्या आवाहनाची जादू केवळ भारतातच नाही, तर अगदी परदेशातही बघायला मिळाली. पंतप्रधान मोदीच्या आवाहनाला दाद देत पाच एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी भारतीयांनी तर दिवे आणि मेणबत्त्या लावल्याच. पण, याच वेळी अमेरिकेतील न्यू जर्सी येथील भारतीय-अमरिकन समुदायानेही कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी आपापल्या घरात दिवे, मेणबत्त्या आणि मोबाईल टॉर्च लावून पंतप्रधानांच्या आवाहनाला दाद दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व भारतीयांना, 'सामूहिक संकल्प' करण्यासाठी पाच एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी आपापल्या घरातील लाईट बंद करून दिवे, मेनबत्ती अथवा मोबाईलच्या टॉर्ट लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली. मात्र, जनतेने मोदींना जो काही प्रतिसाद दिला आणि घराघरात जे दीप उजळले त्यातून कोरोनाविरोधातील देशाच्या एकतेचे जगाला दर्शण घडले आहे.
यावेळी अमेरिकेतील काही नागरिकांनी धार्मिक मत्रोच्चार केला तर काहींनी प्रार्थना केली. या शिवाय काही नागरिकांनी तर आपल्या घरात भारत आणि अमेरिकेचा ध्वज टेबलावर ठेवून त्याभोवती दिवे आणि मेणबत्त्या लावल्याचेही बघायला मिळाले.
"अमेरिचे हार्ट म्हणवल्या जाणाऱ्या न्यु यॉर्क शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आता, भारत आणि अमेरिका सोबत उभे आहेत आणि हे दोघेही आपल्या नागरिकांसाठी आणि जगासाठी विजयी होतील. ते या साथीच्या रोगावर नक्कीच पर्याय शोधतील," अशी भावना न्यू यॉर्क शहरातील रहिवासी राजलक्ष्मी शाह यांनी एएनआयशी बालताना व्यक्त केली.
भारतीयांनीही यावेळी बरोबर 9 वाजता आपल्या घरातील लाईट बंद करून दरवाजा, खिडक्या, बालकणी, गच्ची आणि अंगणातही दिवे लावून, कोरोनाच्या लढाईत आम्ही सर्वजण एकसाथ आहोत, हे दाखवून दिले. हे संपूर्ण दृश्य पाहण्यासारखे होते. मोदींच्या या आवाहनाला देशातील नागरिकांनी दिलेल्या या प्रतिसादानंतर ठिकठिकाणी दिवे दिसत होते. दिवाळी नसतानाही दिवाळीसारखेच दृष्य निर्माण झाले होते.