पेशावर हल्ल्यानंतर १८२ मदरशांना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2016 02:33 AM2016-02-02T02:33:42+5:302016-02-02T02:33:42+5:30
पेशावरच्या शाळेवरील २०१४च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादात कथितरीत्या गुंतलेल्या मदरशांवर देशव्यापी कारवाई करताना १८२ मदरसे बंद केले आहेत.
इस्लामाबाद : पेशावरच्या शाळेवरील २०१४च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादात कथितरीत्या गुंतलेल्या मदरशांवर देशव्यापी कारवाई करताना १८२ मदरसे बंद केले आहेत.
बंद करण्यात आलेले मदरसे पंजाब, सिंध आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतातील आहेत. कट्टरवादाच्या प्रसारात कथितरीत्या गुंतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे असोसिएटेड प्रेस आॅफ पाकिस्तानने (एपीपी) आपल्या अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय कारवाई योजनेअंतर्गत (एनएपी) ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, दहशतवादी कारवायांना होणाऱ्या वित्तपुरवठ्याला लगाम घालण्यासाठी स्टेट बँक आॅफ पाकिस्तानने आतापर्यंत १२६ बँक खात्यातील जवळपास एक अब्ज रुपयांच्या व्यवहारांवर टाच आणली. ही खाती दहशतवाद्यांची संबंधित होती. पोलिसांनीही २५ कोटी १० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. (वृत्तसंस्था)