तालिबानच्या धमकीला अमेरिका घाबरली? ज्यो बायडन यांनी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 03:48 PM2021-08-25T15:48:00+5:302021-08-25T15:50:10+5:30
अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकांनी तालिबानचा नेता मुल्ला बरदारची भेट घेतली होती. मात्र, 31 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढविण्यासंदर्भात त्यांच्यात एकमत झाले नाही.
वॉशिंग्टन - तालिबानच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. एवढेच नाही, तर अमेरिकेने ज्या सैनिकांना अफगाण लोकांना बाहेर काढण्यासाठी पाठविले होते, त्यांनाही 31 ऑगस्टपर्यंत बाहेर काढण्यासाठी अमेरिकेला योजना तयार करावी लागेल. यातच, अमेरिकेचे काही सहकारी देश अमेरिकेकडे विनंती करत आहेत, की नागरिकांना बाहेर काढण्याची अंतिम मुदत वाढविण्यात यावी. मात्र, तालिबानच्या धमकीमुळे अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन 31 ऑगस्टच्या डेडलाईनवर कायम आहेत. (After Taliban warning Biden begins withdrawing troops from Afghanistan before deadline)
अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकांनी तालिबानचा नेता मुल्ला बरदारची भेट घेतली होती. मात्र, 31 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढविण्यासंदर्भात त्यांच्यात एकमत झाले नाही. तत्पूर्वी, अमेरिकेने 31 ऑगस्टपर्यंत आपले सैन्य मागे घ्यावे, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीनने दिली आहे.
अमेरिकेच्या 'या' एका कृतीवर तालिबान भडकला; दिला इशारा
ऑपरेशन जेवढ्या लवकर पूर्ण करू तेवढे चांगलेच -
काबुलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या अमेरिकेचे सुमारे 5,800 सैनिक आहेत. बायडन यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे, की "सध्या आपण 31 ऑगस्टपर्यंत सैन्य मागे घेण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत. आपण हे ऑपरेशन जेवढ्या लवकर पूर्ण करू तेवढे चांगलेच आहे. या ऑपरेशनमध्ये रोजच्या रोज आपल्या सैनिकांना धोका वढत आहे. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत आपले ऑपरेशन पूर्ण होणे, हे तालिबानच्या सहकार्यावर, लोकांना विमानतळावर येण्याची परवानगी देण्यावर आणि आपल्या अभियानात अडथळा निर्माण न करण्यावर अवलंबून आहे."
अमेरिकेने स्वतःच निर्धारित केलेल्या मुदतीवर ठाम रहावे -
अमेरिकेने 31 ऑगस्टपर्यंत आपले सर्व सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती. तालिबानने 15 ऑगस्टला अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. यानंतर तालिबानने अमेरिकेला 31 ऑगस्टपर्यंत आपले सैन्य माघारी घेण्याचे अभियान पूर्ण करावे, असा इशाराही दिला होता. तसेच, तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने मंगळवारी काबुलमध्ये एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे,की अमेरिकेने त्याच्या स्वतःच्या अंतिम मुदतीवर कायम रहावे.