पॉर्नस्टार प्रकरणानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २४ तासांत जमविले ३२ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 11:12 AM2023-04-02T11:12:25+5:302023-04-02T11:12:41+5:30
२००६ मध्ये झाली प्रकरणाला सुरूवात
न्यूयॉर्क: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मॅनहटन न्यायालयात फौजदारी खटला चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरच्या चोवीस तासांत ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून ३२ कोटी ८७ लाख रुपये (४० लाख डाॅलर) इतका निधी गोळा केला. ट्रम्प हे ४ एप्रिल रोजी न्यायालयासमोर शरण येणार आहेत. या घडामोडींमुळे त्यांचे मार-ए-लागो येथील निवासस्थान, ट्रम्प टॉवर, मॅनहटन न्यायालय येथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. २०२४च्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इरादा असला तरी त्याला फौजदारी खटल्यामुळे सुरूंग लागण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला चालविला जाणार ही बातमी पसरल्यावर त्यांचे समर्थक सक्रिय झाले. शुक्रवारी फ्लोरिडा येथील मार-ए-लागो येेथे त्यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थक गोळा झाले होते.
२००६ मध्ये झाली प्रकरणाला सुरूवात
- २००६ साली पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिच्याबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रेमप्रकरणाला सुरूवात झाली.
- २०१६मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प रिंगणात उतरले. त्यावेळी प्रेमप्रकरणाबाबत मौन बाळगावे म्हणून त्यांनी स्टॉर्मीला १ कोटी ७ लाख रुपये दिले होते.
- याची बातमी अमेरिकेतील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली. त्यानंतर फौजदारी कारवाई सुरू झाली.
- याच प्रकरणाच्या आधारे ट्रम्प यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे.
स्टाॅर्मीने ‘फुल डिस्कलाेजर’ या तिच्या आत्मचरित्रात डाेनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीचा उल्लेख केला आहे. ही भेट झाली त्यावेळी ट्रम्प यांची तिसरी पत्नी मेलेनिया यांनी नुकताच मुलगा बॅरन याला जन्म दिला हाेता. एका पेंटहाऊसमध्ये ही भेट झाली हाेती. त्यानंतर दाेघांचे प्रेमप्रकरण फुलले.
पोलिसांच्या रजा रद्द
- माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होत असलेल्या कारवाईमुळे अमेरिकेत येत्या काही दिवसांत उग्र निदर्शने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वॉशिंग्टन व अन्य ठिकाणच्या पोलिसांच्या रजा रद्द करून त्यांना कामावर बोलाविण्यात आले आहे.
- न्यूयॉर्कमध्ये पोलीसांनी कडक बंदोबस्त राखला आहे. मॅनहटन न्यायालयाच्या परिसरात अधिक संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
सुरक्षेचा घेतला आढावा
डोनाल्ड ट्रम्प ३ एप्रिल रोजी फ्लोरिडाहून न्यूयॉर्कला येतील. त्या रात्री ते ट्रम्प टॉवर येथे मुक्काम करतील व ४ एप्रिलला ते सकाळी मॅनहटन न्यायालयासमोर शरण येणार आहेत. त्यामुळे न्यूयॉर्कच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रम्प व न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा शुक्रवारी आढावा घेतला.
वॉशिंग्टन येथील राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊसच्या बाहेर ट्रम्प समर्थकांनी ‘सेव्ह अमेरिका’ अशी घोषणा लिहिलेल्या टोप्या व अन्य वस्तूंची विक्री करून अनोख्या पद्धतीने निदर्शने केली.