Sri Lanka Monkey China: पाकिस्तानच्या गाढवांनंतर आता श्रीलंकेच्या 1 लाख माकडांची खरेदी करतोय चीन, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 12:27 AM2023-04-15T00:27:09+5:302023-04-15T00:27:17+5:30
श्रीलंकन सरकारमधील अनेक वरिष्ठ मंत्री चीनला माकडांची निर्यात करण्याच्या बाजूने आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, माकडांमुळे श्रीलंकेतील शेतीचे मोठे नुकसान हेत आहे. यामुळे चीनला 1 लाख माकडांची निर्यात करण्यात काहीच नुकसान नाही.
कोलंबो : पाकिस्तानातून गाढवांची खरेदी करणारा चीन आता श्रीलंकेतून माकडे आयात करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात चीन आणि श्रीलंका यांच्यात चर्चेच्या तीन फेऱ्याही झाल्या आहेत. पण यावर अद्याप कसल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. श्रीलंकन सरकारमधील अनेक वरिष्ठ मंत्री चीनला माकडांची निर्यात करण्याच्या बाजूने आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, माकडांमुळे श्रीलंकेतील शेतीचे मोठे नुकसान हेत आहे. यामुळे चीनला 1 लाख माकडांची निर्यात करण्यात काहीच नुकसान नाही. कारण या माकडांना पकडण्याचा आणि निर्यातीचा खर्चही चीनच करणार आहे. महत्वाचे म्हणजे, या माकडांना चीन प्राणीसंग्रहालयात ठेवणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र चीनमध्ये माकडाचे मांसही अत्यंत लोकप्रिय आहे.
श्रीलंकन माकडांना प्राणीसंग्रहालयात ठेवणार चीन -
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेचे कृषी मंत्री महिंदा अमरवीरा यांनी म्हटले आहे की, चीनमध्ये माकडांची निर्यात करण्यासंदर्भा अद्याप कुठल्याही प्रकारचा अंतिम निर्णय झालेला नाही. चीनने 1 लाख माकडांची निर्यात करण्यासंदर्भात विनंती केली आहे. या माकडांना तेथील एक हजार प्राणिसंग्रहालयांमध्ये ठेवण्याची चीनची इच्छा आहे. दरम्यान, श्रीलंकन कृषी मंत्रालयाचे अधिकारी यासंदर्भात राष्ट्रीय प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका कत आहेत. तसेच, श्रीलंका सरकारने यासंदर्भात एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेतला आहे, जी माकडांच्या निर्यातीशी संबंधित कायदेशीर बाबींवर लक्ष ठेवेल.
माकडाच्या निर्यातीमागील तर्क -
श्रीलंकेत माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. गेल्या एका वर्षात माकडांनी सुमारे 2 कोटी नारळांचे नुकसान केले. शेती पिकांचे नुकसान होत असल्याने त्याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बसत आहे. श्रीलंकेत 30 लाखहून अधिक माकडं आहेत. त्यामुळे 1 लाख माकडांची निर्यात केल्याने काहीही नुकसान होणार नाही. असा दावा कृषी मंत्री महिंदा अमरवीरा यांनी केला आहे. ते लवकरच श्रीलंकेच्या मंत्रिमंडळासमोर चीनला माकडांच्या निर्यातीसंदर्भातील प्रस्तावही मांडणार आहे.