इसिसच्या धमकीनंतर जर्मनीच्या म्युनिचमधील २ रेल्वे स्टेशन्स बंद
By admin | Published: January 1, 2016 01:35 PM2016-01-01T13:35:41+5:302016-01-01T13:38:53+5:30
इसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेने नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्युनिचमध्ये आत्मघातकी हल्ले करण्याची धमकी दिल्यानंतर म्युनिचमधील रेल्वे स्टेशन्स रिकामी करून तेथील रेल्वे सेवाही थांबवण्यात आली.
Next
>ऑनलाइन लोकमत
म्युनिच, दि. १ - संपूर्ण जग गुरूवारी संध्याकाळी नववर्षाच्या स्वागतात मग्न असताना जर्मनीतील म्युनिचमध्ये मात्र दहशतवादी हल्ल्याच्या भयाने दोन रेल्वे स्टेशन्स रिकामी करून तेथील रेल्वे सेवा बंद करण्यात आली. कुख्यात दहशतवादी संघटना 'इसिस'च्या दहशतवाद्यांनी म्युनिचमध्ये हल्ला करण्याची धमकी दिल्याची खबर फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणेतील अधिका-यांनी जर्मनीच्या अधिका-यांना दिल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून म्युनिचमध्ये ही कारवाई करण्यात आली.
इसिसचे पाच ते सात दहशतवादी नववर्षाच्या रात्री म्युनिचमध्ये आत्मघातकी हल्ला करू शकतात. शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानकासह आणखी एक रेल्वे स्थानक त्यांच्या निशाण्यावर असेल, अशी खबर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ शहरातील सुरक्षा बंदोबस्तात वाढ करत दोन्ही रेल्वे स्थानके तातडीने रिकामी करून तेथील रेल्वे सेवाही थांबवली.