धमकीनंतर अमेरिकेत एक हजार शाळा बंद
By admin | Published: December 16, 2015 01:37 AM2015-12-16T01:37:55+5:302015-12-16T01:37:55+5:30
विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याचा संदेश मिळाल्यानंतर लॉस एंजिल्समधील एक हजाराहून अधिक शाळा मंगळवारी बंद करण्यात आल्या. या शाळांमध्ये ६,४०,००० विद्यार्थी आहेत.
लॉस एंजिल्स : विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याचा संदेश मिळाल्यानंतर लॉस एंजिल्समधील एक हजाराहून अधिक शाळा मंगळवारी बंद करण्यात आल्या. या शाळांमध्ये ६,४०,००० विद्यार्थी आहेत. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना असलेल्या धोक्याचे स्वरूप सांगितले नाही.
मंगळवारी सकाळीच आमच्या शाळांच्या सुरक्षिततेला धोका असल्याचा संदेश इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आम्हाला मिळाला,
असे येथील शाळांच्या पोलीस विभागाचे प्रमुख स्टिव्हन झिपरमन यांनी वार्ताहर परिषदेत
सांगितले.
आमच्या शाळांचा परिसर पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी खात्री पटेपर्यंत आज आम्ही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. पोलीस सर्व शाळांची झडती घेत आहेत. शाळा संचालक मंडळातील एका सदस्याला ई-मेलद्वारे मिळालेला हा संदेश परदेशातून आला असण्याची शक्यता आहे. मुस्लिम जोडप्याने कॅलिफोर्नियात १४ जणांचे हत्याकांड घडवून आणल्याच्या पार्श्वभूमीवर देशात अतिसतर्कता बाळगण्यात येत असताना हा संदेश प्राप्त झाला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत शाळा बंद केल्या. गतकाळात आणि अलीकडे काय घडले या आधारावर शाळा बंद करण्याचे प्रतिबंधात्मक पाऊल उचलणे आवश्यक होते, असे जिल्हा अधीक्षक रॅमन कोर्टीनेस यांनी सांगितले.
धोक्याचा संदेश कोणा एका किंवा दोन-तीन शाळांसाठी नाही, तर अनेक शाळांसाठी होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा डोळ्यांसमोर ठेवून मी हा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. दरम्यान, बॉम्बहल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर सॅन बर्नार्डिनो व्हॅली कॉलेजही मंगळवारी दुपारी बंद करण्यात आले.