मोदी दौ-यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादावरुन खडसावलं
By admin | Published: June 10, 2016 01:07 PM2016-06-10T13:07:35+5:302016-06-10T13:20:52+5:30
अमेरिकेने पाकिस्तानला तुमच्या देशात भारतावर हल्ले करण्यासाठी कट रचले जात नाही आहेत ना याची खातरजमा करा असा सल्ला दिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 10 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादावरुन खडसावलं आहे. अमेरिकेने पाकिस्तानला तुमच्या देशात भारतावर हल्ले करण्यासाठी कट रचले जात नाही आहेत ना याची खातरजमा करा असा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे भाषण करताना दहशतवादापासून संपूर्ण जगाला धोका असून, आमच्या शेजारीच दहशतवादाचे केंद्र आहे म्हणत अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानवर टीका केली होती.
'पाकिस्तानचे भारतासोबत संबंध सुधारावेत यासाठी अमेरिकेने उचललेलं हे पाऊल असल्याचं', अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितलं आहे. 'पाकिस्तान आणि भारताने एकमेकांशी चर्चा तसंच मदत केल्यास परिस्थिती सुधारु शकते. यासाठी काही पावलं उचलण्याची गरज आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानने आपल्या देशातील जमिनीवर भारतावर हल्ला करण्यासाठी कट रचले जात नाहीत ना याची खातरजमा करावी. तसंच आपल्या देशातील सर्व दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करावी', असंही मार्क टोनर बोलले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौ-यात ओबामांसोबत झालेल्या चर्चेत पाकिस्तान महत्वाचा मुद्दा होता अशी माहिती मार्क टोनर यांनी दिली आहे. दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानने लढा उभारल्यास त्यांना आम्ही साथ देऊ. केवळ दहशतवादाच्या मुद्यावर आम्ही पाकिस्तानला सहकार्य करण्यास तयार आहोत, असंही टोनर यांनी नमूद केलं.
भारत आणि पाकिस्तान यांच्याशी अमेरिकेशी द्विपक्षीय संबंध चांगले आहेत. एका देशाशी चांगले संबंध म्हणजे दुसऱ्या देशाशी वाईट असं नाही. दोन्ही देशांचे प्रश्न वेगळे आहेत, असंही मार्क टोनर बोलले आहेत.
दहशतवादापासून संपूर्ण जगाला धोका असून, आमच्या शेजारीच दहशतवादाचे केंद्र आहे. राजकीय स्वार्थासाठी दहशतवादाचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे, असा थेट हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाकिस्तानचे नाव न घेता चढविला होता.
अमेरिकी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे बुधवारी भाषण करताना त्यांनी भारताची दहशतवादाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आज जगालाच दहशतवादापासून गंभीर धोका आहे. मात्र काही देश राजकीय स्वार्थासाठी दहशतवादाचा वापर करीत आहेत. दहशतवाद्यांना काही देशांत पोसले जात आहे. त्यांच्यावर आता कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. सर्वांनी मिळूनच दहशतवादाचा बिमोड करायला हवा.