जगभरात अब्जावधी रुपयांचे दान करणारे धर्मगुरू आगा खान यांचे निधन, PM मोदींनी व्यक्त केला शोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 08:55 IST2025-02-06T08:53:37+5:302025-02-06T08:55:45+5:30

आगा खान चवथे यांचा वारसदार कोण असेल याविषयी त्यांनी आपल्या मृत्युपत्रामध्ये उल्लेख केला आहे. त्या मृत्युपत्राचे वाचन लिस्बनमधील त्यांचे कुटुंबीय व धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत केले जाईल.

Aga Khan passes away, a religious leader who donated billions of rupees worldwide, | जगभरात अब्जावधी रुपयांचे दान करणारे धर्मगुरू आगा खान यांचे निधन, PM मोदींनी व्यक्त केला शोक

जगभरात अब्जावधी रुपयांचे दान करणारे धर्मगुरू आगा खान यांचे निधन, PM मोदींनी व्यक्त केला शोक

पॅरिस : हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना वयाच्या २०व्या वर्षी जगभरातील इस्माइली मुस्लिमांचे धर्मगुरू बनलेले व अब्जावधी रुपयांचे दान करून त्यातून गरीब देशांमध्ये घरे, रुग्णालये, शाळा आदी गोष्टी बांधणारे प्रिन्स करीम अल-हुसेनी आगा खान (चतुर्थ) यांचे पोर्तुगालमध्ये मंगळवारी निधन झाले. त्यांचे वय ८८ वर्षे होते.
 
आगा खान चौथे यांचा वारसदार कोण असेल याविषयी त्यांनी आपल्या मृत्युपत्रामध्ये उल्लेख केला आहे. त्या मृत्युपत्राचे वाचन लिस्बनमधील त्यांचे कुटुंबीय व धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत केले जाईल. त्यानंतर ही माहिती सर्वांकरिता जाहीर करण्यात येईल. इस्माइली मुस्लिमांचे धार्मिक गुरू हे त्यांचे पुत्र किंवा त्यांच्या नातेवाइकांमधूनच निवडण्यात येतात, अशी माहिती इस्माइली समुदायाच्या वेबसाइटवर दिली आहे. आगा खान चवथे यांच्या मृत्युपत्राचे वाचन व त्यांची अंत्ययात्रा या प्रक्रिया येत्या काही दिवसांत पार पडतील, असे या समुदायाने म्हटले आहे. 

स्वित्झर्लंडमध्ये जन्म

आगा खान चवथे यांचा जन्म १३ डिसेंबर १९३६ रोजी स्वित्झर्लंडमध्ये झाला. अली खान व जोआन यार्ड-बुलर या दाम्पत्याचे ते पुत्र आहेत. बालपणी काही वर्षे ते नैरोबीमध्ये वास्तव्याला होते. आता तिथे त्यांच्या नावाने एक रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्यांनी अश्वपालनाचाही व्यवसाय केला. १९६४च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये इराणचे प्रतिनिधी म्हणून ते स्किईंगमध्ये सहभागी झाले. त्यांना वास्तुशास्त्राची आवड होती. त्यांचे फ्रान्समध्ये अधिक काळ वास्तव्य होते. त्यांच्या मागे तीन पुत्र, एक कन्या, नातवंडे असा परिवार आहे.

आध्यात्मिक, ऐहिक गोष्टींचा योग्य मेळ साधला

आगा खान चवथे यांचे अनुयायी त्यांना महंमद पैगंबरांचे थेट वंशज मानतात व त्यांना एखाद्या राज्यप्रमुखासारखे स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या आजोबांनी त्यांची इस्माइली मुस्लिमांच्या धार्मिक गुरूपदी निवड केली. ही प्रक्रिया पार पाडताना आगा खान चवथे यांच्या वडिलांच्या नावाचा विचार करण्यात आला नाही.

आधुनिकतेचे संस्कार झालेले ते इस्माइली मुस्लिमांचे उत्तम नेतृत्व करू शकतील, असे त्यांच्या आजोबांना वाटले होते. ते एक यशस्वी उद्योजक तसेच दानशूर वृत्तीचे होते. त्यामुळे त्यांनी आध्यात्मिक व ऐहिक गोष्टींचा मेळ साधून समाजोपयोगी कामे केली. 

३० देशांमध्ये समाजसेवी कार्याचा केला विस्तार

आगा खान चवथे यांच्या कार्याचा विस्तार खूप मोठा आहे. त्यांनी आरोग्यसेवा, गरिबांसाठी घरे बांधणे, शिक्षण आणि ग्रामीण आर्थिक विकास या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.

आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क ही संस्था ३०पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे. त्या ठिकाणी समाजकार्यासाठी ही संस्था दरवर्षी सुमारे ८ हजार कोटी रुपये खर्च करते. आगा खान चवथे यांच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. 

इस्माइली समाजाचे बहुसंख्य सदस्य भारतात होते. हे लोक त्यांच्या उत्पन्नाचा १२.५% भाग आगा खान यांना दान करतात. त्यातूनच जगभरात मोठे सामाजिक कार्य केले जाते.

आगा खान चवथे यांनी आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास आणि महिला सबलीकरण क्षेत्रात केलेल्या कामामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांनी आपले सारे आयुष्य समाजकार्य व धार्मिक गोष्टींसाठी वेचले. माझी त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली होती. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आगा खान चवथे हे शिक्षण, प्रगतीला प्राधान्य देणारे, मानवतावादी कार्यासाठी झटणारे महान व्यक्ती होते. त्यांच्यासारख्या दूरदर्शी व्यक्तीचे निधन ही समाजाची मोठी हानी आहे. -राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा

Web Title: Aga Khan passes away, a religious leader who donated billions of rupees worldwide,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.