वय वर्षे ४०, पंधरा बाळांतपणं आणि ४४ मुलं !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 07:59 AM2022-07-12T07:59:40+5:302022-07-12T08:00:30+5:30

जगातील एका अनोख्या घटनेनं मात्र सगळ्यांचेच डोळे आश्चर्यानं विस्फारले आहेत.

Age 40 years 44 children know everything story of mama uganda | वय वर्षे ४०, पंधरा बाळांतपणं आणि ४४ मुलं !

वय वर्षे ४०, पंधरा बाळांतपणं आणि ४४ मुलं !

googlenewsNext

पूर्वीच्या काळी दाम्पत्याला अनेक मुलं असायची. अगदी आठ-आठ, दहा-दहा आणि डझनभर मुलं ! हल्लीच्या काळात एखाद्या दाम्पत्याला दोन-तीनपेक्षा जास्त मुलं असतील तर अनेकांचे डोळे आश्चर्यानं मोठे होतात. पूर्वी अनेक दाम्पत्यांना भरपूर मुलं असायची, कारण त्यावेळचा सामाजिक ट्रेंडच तसा होता, एवढंच नव्हे, तर अनेकदा मुलं लहानपणीच दगावण्याचं प्रमाणही खूप मोठं होतं. आरोग्याच्या सोयी-सुविधा पुरेशा नव्हत्या आणि आपला वंश पुढे चालावा ही प्रत्येक सजीवाची तीव्र इच्छा असते, तशीच मानवाचीही होती. 

आज मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. अनेक दाम्पत्यांना एक किंवा फारतर दोन अपत्यं असतात. कारण जास्त मुलं असली तर मुलांच्या संगोपनाकडे पुरेसं लक्ष देता येत नाही, जास्त मुलांच्या पालनपोषणाचा खर्च परवडत नाही आणि पालकांनाही या साऱ्या धबडग्यात मुलांकडे आणि स्वत:कडेही लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, स्वत:ला, एकमेकांना स्पेस देता येत नाही. त्यामुळे एक किंवा दोन मुलांवरच आजकाल प्रत्येक घरातला पाळणा थांबतो..

जगातील एका अनोख्या घटनेनं मात्र सगळ्यांचेच डोळे आश्चर्यानं विस्फारले आहेत. - एखाद्या महिलेनं किती मुलांना जन्म द्यावा? पूर्व आफ्रिकेतील युगांडा या देशातील मरिअम नाबातान्झी या ४० वर्षीय महिलेनं २८ वर्षांत तब्बल ४४ मुलांना जन्म दिला आहे ! तुम्ही म्हणाल, कसं शक्य आहे हे? - हो, पण ही खरी गोष्ट आहे आणि याच कारणावरून मरिअम सध्या संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय झाली आहे. 

मरिअमची कहाणीही तशी दर्दभरी आहे. अत्यंत गरीब घरात ती जन्माला आली आणि लग्नानंतरही तिच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. उलट अनंत हालअपेष्टांना तिला सामोरं जावं लागलं. तिचा नवराही अतिशय गरीब होता आणि तुटपुंज्या आमदनीवर त्यांना भागवावं लागत होतं. 

वयाच्या बाराव्या वर्षीच मरिअमचं लग्न झालं आणि वयाच्या तेराव्या वर्षी तिला पहिलं बाळही झालं. डॉक्टरांनी त्याचवेळी तिला सांगितलं होतं, अनेक मुलं होण्याची क्षमता आणि शक्ती तुझ्यात आहे. सर्वसाधारण महिलेपेक्षा बऱ्याच जास्त मुलांना तू जन्म देऊ शकतेस; पण तुला स्वत:लाच जास्त मुलं नको असली तरी तुला मुलांना जन्म देत राहावंच लागणार आहे. मुलांना जन्म देणं तू थांबवलंस तर त्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे! त्यामुळे तुला कदाचित तुझे प्राणही गमवावे लागतील!

मरिअमनं आजवर इतक्या मुलांना जन्म दिला; पण बाळंतपणात तिला कोणत्याही विशेष उपचारांची गरज भासली नाही आणि कुठल्या मेडिकल कॉम्प्लिकेशन्सही निर्माण झाल्या नाहीत. प्रत्येक बाळाच्या जन्मानंतर ती अगदी ठणठणीत होती.  मरिअमची केस जगावेगळी असली, स्वत:चा जीव वाचवायचा तर मुलांना जन्म देत राहाणं तिला आवश्यकच होतं, तरीही पाळणा थांबवण्याचं आधुनिक तंत्रज्ञान आजच्या काळात उपलब्ध आहेच, पण ज्या ठिकाणी ती राहाते, त्या दुर्गम, आदिवासी भागात हे तंत्रज्ञान आणि अशा प्रकारचे आधुनिक वैद्यकीय उपचार अजून पोहोचलेले नाहीत. समजा तशी सोय असती तरीही हा खर्च तिला झेपणारा नव्हता. त्यामुळे हा एवढा मोठा खर्च करण्यापेक्षा मुलांना जन्म देत राहाणं हेच तिच्या दृष्टीनं जास्त सोयीचं होतं. मरिअमच्या नशिबाचे फेरे इतके खडतर की, तिचा नवराही निकम्मा निघाला. इतकी मुलं असताना मरिअमला साथ देण्याऐवजी घरात असेल नसेल ते सारं, पैसाअडका घेऊन तोच घरातून फरार झाला.  

त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी मुलं असूनही मरिअम अजूनही हिंमत हरलेली नाही. या सगळ्या मुलांचं ती हिंमतीनं स्वत: पालनपोषण करते आहे. त्यांना वाढवते आहे. त्यासाठी मिळेल ते काम करून, प्रसंगी चोवीस तास कष्ट करून मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिनं उचलली आहे. मरिअम म्हणते, ही माझी मुलं आहेत, मीच त्यांना जन्म दिला आहे, त्यामुळे त्यांना वाढवण्याची जबाबदारीही माझीच आहे. त्यापासून पळून जाण्यात किंवा मागे हटण्यात काहीच मतलब नाही. इतकी मुलं असल्यामुळे मरिअमला ‘ममा युगांडा’ या नावानंही ओळखलं जातं. ‘द मोस्ट फर्टाइल वूमन ऑन अर्थ’ म्हणूनही जगभरात ती प्रसिद्ध झाली आहे.

१५ बाळंतपणात ४४ मुलं! 
‘ममा युगांडा’ मरिअमनं आतापर्यंत ४४ मुलांना जन्म दिला; पण त्यातील फक्त एकच प्रसंग असा आहे, ज्यावेळी तिनं एकावेळी एकाच मुलाला जन्म दिला. तिनं चार वेळा जुळ्यांना, पाच वेळा तिळ्यांना, तर पाच वेळा एकदम चार मुलांना जन्म दिला आहे. या ४४ मुलांतील सहा मुलं दगावली असल्यानं सध्या ३८ मुलांचा सांभाळ मरिअम करते आहे. त्यात १६ मुली  तर २२ मुलं आहेत.

Web Title: Age 40 years 44 children know everything story of mama uganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.