वय 45, मात्र फिटनेस 18 वर्षांच्या युवकासारखा! उपचारांनी घटविले जैविक वय; केला १६ कोटींहून अधिक खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 06:53 AM2023-01-30T06:53:33+5:302023-01-30T06:53:55+5:30
वय वाढत असले तरी प्रत्येकाला आपण कायम तरुण दिसावे ही मनात इच्छा असतेच. ४५ वर्षे वय असलेल्या ब्रायन जॉन्सन याने विविध उपचार व व्यायामाद्वारे आपला फिटनेस १८ वर्षाच्या युवकाएवढा राखला आहे.
वॉशिंग्टन : वय वाढत असले तरी प्रत्येकाला आपण कायम तरुण दिसावे ही मनात इच्छा असतेच. ४५ वर्षे वय असलेल्या ब्रायन जॉन्सन याने विविध उपचार व व्यायामाद्वारे आपला फिटनेस १८ वर्षाच्या युवकाएवढा राखला आहे.
जॉन्सन याचे हृदय ३५ वर्षे वयाच्या व्यक्तीइतके कार्यक्षम असून त्याची त्वचा २८ वर्षांच्या व्यक्तीइतकी सतेज आहे. ब्रायनच्या फुप्फुसांची कार्यक्षमता १८ वर्षाच्या युवकाइतकी तर पचनशक्ती १७ वर्षे वयाच्या मुलाइतकी आहे. आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्याकरिता उपचारांवर त्याने आतापर्यंत १६ कोटी रुपयांहून अधिक पैसे खर्च केले आहेत. (वृत्तसंस्था)
प्रोजेक्ट ब्लू प्रिंट
सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेल्या ब्रायन जॉन्सन याचे जैविक वय घटविण्याची प्रक्रिया यापुढेही सुरू राहणार आहे. त्याच्या शरीरातील सर्व अवयव १८ वर्षे वयाच्या युवकाइतके कार्यक्षम होईपर्यंत हे उपचार केले जातील. या सर्व प्रक्रियेला प्रोजेक्ट ब्लू प्रिंट असे नाव देण्यात आले आहे.
३० जणांचे पथक डॉक्टर ऑलिव्हर जोलमॅन यांच्या नेतृत्वाखाली ब्रायनवर उपचार करत आहे.
३० डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार
nडॉ. ऑलिव्हर जोलमॅन यांनी ब्रायन जॉन्सन याची वैद्यकीय तपासणी केली. त्याने जैविक वय घटविण्यासाठी काय जेवण घ्यायचे, कोणता व्यायाम करायचा हे निश्चित करण्यात आले. रोज पहाटे पाच वाजता त्याचा दिवस सप्लिमेंटने सुरू होतो. त्याला लाइकोपीन, झिंक, मेटफॉर्मिन ही औषधे दिली जातात.
nमेंदू अतिशय कार्यक्षम राहावा यासाठीही एक औषध दिले जाते. ब्रायनने केवळ व्हेगन फूडचे (दुग्धजन्य उत्पादनांचा समावेश नसलेले शाकाहारी खाद्यपदार्थ) सेवन करावे असा सल्ला डॉक्टरांनी त्याला दिला आहे. रोज त्याला १९७७ कॅलरी मिळेल इतका नाश्ता, जेवण दिले जाते.
जैविक वयात केली ५ वर्षांनी घट
ब्रायन जॉन्सन रोज एक तास सकाळी व्यायाम करतो. त्याने रोज रात्री किती वाजता झोपी जावे, पहाटे किती वाजता उठावे याच्या वेळा डॉक्टरांनी निश्चित केल्या आहेत. डॉक्टर रोज त्याचे वजन, शरीरातील चरबी, बीएमआय, ग्लुकोज, हृदयाचे ठोके, ऑक्सिजनचे प्रमाण अशा गोष्टींची तपासणी करतात. तसेच दर महिन्याला त्याच्या एमआरआय, अल्ट्रासाउंड, कोलोनॉस्कोपी या चाचण्या केल्या जातात. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे ब्रायन काटेकोर पालन करत असल्याने त्याने आपले जैविक वय ५ वर्षांनी कमी केले आहे.