Ahmadi mosque Pakistan: पाकिस्तानात अहमदी मुस्लिमांच्या मशिदीवर हल्ला; हातोड्याने मिनार तोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 05:18 PM2023-02-03T17:18:48+5:302023-02-03T17:18:59+5:30
Attacks On Minorities In Pakistan: पाकिस्तानात 40 लाख लोकसंख्या असलेल्या अहमदिया मुस्लिमांविरोधात हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत.
Attacks On Minorities In Pakistan: पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लिमांविरोधात आणखी एक मोठी घटना घडली आहे. शुक्रवारी काही कट्टरपंथींनी कराचीच्या हाशू सदर मार्केटमधील अहमदिया मशिदीत घुसून तोडफोड केली. यावेळी हेल्मेट घालून आलेल्या हल्लेखोरांनी हातात छन्नी-हातोडा घेऊन मशिदीचे मिनार तोडले. यावेळी परिसरात मोठा गोंधळ उडाला होता.
या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. अहमदिया गटातून या घटनेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका महिन्यात अहमदिया गटाविरोधात ही दुसरी घटना आहे. याआधी कराचीतील जमशेद रोडवरील अहमदिया जमात खात्याच्या मिनारांची तोडफोड करण्यात आली होती. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, शुक्रवारी हेल्मेट घातलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कराचीतील सदर येथील अहमदी मशिदीला लक्ष्य केले. एका व्हिडिओमध्ये हल्लेखोर या मशिदीचे मिनार तोडताना दिसत आहे.
After Punjab, demolishing the minarets of Ahmadi places of worship started in Karachi. Today, a group of people demolished the minarets of an Ahmadi place of worship in Saddar. Two weeks ago, another Ahmadi worship place's minarets were also demolished in Martin Quarters. pic.twitter.com/X2EnUAtnVV
— Zia Ur Rehman (@zalmayzia) February 2, 2023
हल्ल्यात तेहरीक-ए-लब्बैकचा हात
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कट्टर इस्लामिक राजकीय पक्ष तहरीक-ए-लब्बैक (टीएलपी) चा हात आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये अहमदिया समुदायावर जमावाने हल्ले आणि हत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. जिनिव्हा डेलीच्या अहवालानुसार, सुमारे 40 लाख लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानी अहमदिया समुदायाला येथील स्वयंघोषित इस्लामिक नेत्यांकडून व्यापक छळ, धार्मिक छळाचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक संस्था आणि सर्वसामान्यांकडून भेदभावाच्या घटना घडतात.
भेदभावाचा मोठा इतिहास
पाकिस्तानच्या अहमदी मुस्लिम समुदायाला 1974 पासून भेदभाव, छळ आणि हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. 1980 च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी एक घटनादुरुस्ती आणली ज्यात विशेषत: अहमदी मुस्लिम समुदायाला गैर-मुस्लिम घोषित करून त्यांना लक्ष्य केले गेले. 1984 मध्ये जनरल झिया-उल-हक यांनी एक अध्यादेश आणला, ज्याने अहमदींचा अधिकार काढून घेतला.