‘एआय’ने केली भविष्यवाणी; कसा असेल पृथ्वीवरील ‘लास्ट सेल्फी’? भयावह फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 05:56 AM2022-08-01T05:56:44+5:302022-08-01T05:57:00+5:30
पृथ्वीवरील अखेरचे सेल्फी असेच असतील, यानंतर जगाचा अंत होईल, असे भाकीत DALL-E 2 ने वर्तविले आहे. परंतु, या दाव्यावर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
लंडन : जगाचा अंत झाला तर ते कसे दिसेल? यावर अनेकदा चर्चा होत असते आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)ने जगाचा अंत होण्यापूर्वी पृथ्वीवरील ‘शेवटचा सेल्फी’ कसा असेल, याची झलक दाखवली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रतिमा बनविणाऱ्या DALL-E 2 ने जनरेट केलेल्या ‘सेल्फी’मध्ये पृथ्वीवर सर्वत्र विनाश आणि विकृत चेहऱ्यांचे लोक सेल्फी घेताना दिसतात. हे भयावह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘रोबोट ओव्हरलोड्स’ नावाच्या टिकटॉक अकाऊंटवरुन DALL-E 2 ला पृथ्वीवरील अखेरचा सेल्फी कसा दिसेल, याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘एआय’ने अनेक प्रतिमा बनवल्या. प्रत्येक प्रतिमेत स्वतःच्या चेहऱ्यासमोर फोन धरलेली एक व्यक्ती आणि त्यांच्या मागे जगाचा अंत होताना दिसतो.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
नेटकऱ्यांमध्ये या ‘लास्ट सेल्फी’बाबत प्रचंड चर्चा रंगली असून, काहीजण यावरून मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. तर, काही नेटिझन्सनी या प्रतिमांना ‘मी पाहिलेली सर्वात भयानक गोष्ट’ असे म्हटले. दुसरीकडे अनेकजण DALL-E 2 च्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित करत आहेत. ‘एआय’चे ‘जगाच्या समाप्ती’बाबतचे विचार आणि अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे देण्याची पद्धत यावरून नेटकरी आपापली मते मांडत आहेत.
सर्वत्र विनाश, आकाशातून बॉम्ब पडण्याची दृश्ये, आगीमुळे बेचिराख झालेली शहरे आणि यादरम्यान हाडांचा सापळा झालेले किंवा ‘झोम्बी’प्रमाणे दिसणारे लोक सेल्फी घेत आहेत.
पृथ्वीवरील अखेरचे सेल्फी असेच असतील, यानंतर जगाचा अंत होईल, असे भाकीत DALL-E 2 ने वर्तविले आहे. परंतु, या दाव्यावर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.
कायआहेDALL-E 2?
या वर्षाच्या सुरूवातीलाच DALL-E 2 ही एआय प्रणाली विकसित करण्यात आली असून, संकेतस्थळावरील दाव्यानुसार ही प्रणाली वापरकर्त्याने केलेल्या वर्णनावरून “वास्तववादी प्रतिमा तयार करू शकते”.