‘इसिस’च्या कब्जातील तेल क्षेत्रावर हवाई हल्ले
By admin | Published: September 26, 2014 05:06 AM2014-09-26T05:06:22+5:302014-09-26T05:06:22+5:30
हवाई हल्ले होण्याच्या भीतीने दहशतवाद्यांनी रक्का येथील तुरुंगातील अनेक बंदीवानांची सुटका केली.
बैरुत : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातील आणि या संघटनेच्या दृष्टीने सर्वार्थाने पाठबळाचे केंद्र असलेल्या सिरियातील तेल प्रकल्पावर अचूक निशाणा साधत अमेरिकेने बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे हवाई केला. यात २० जण ठार झाले. आणखी हवाई हल्ले होण्याच्या भीतीने दहशतवाद्यांनी रक्का येथील तुरुंगातील अनेक बंदीवानांची सुटका केली.
सिरिया आणि इराकमधील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी ठाम निर्धार केला असून हा निर्धार तडीस नेण्यासाठी या संघटनेच्या अड्ड्यांना लक्ष्य करीत हवाई हल्ले चढविण्यात येत आहेत.
इस्लामिक स्टेट संघटनेने या वर्षाच्या सुरुवातीला सिरियातील सर्वात मोठ्या तेल क्षेत्रावर कब्जा मिळविला होता. तेलाची तस्करी करून ते काळ्या बाजारात विकून ही संघटना आपल्या कारवायांसाठी आर्थिक पाठबळ उभे करीत. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्यात मयादीन शहराभोवतालचे चार तेल प्रकल्प आणि तीन तेल क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले, असे ब्रिटनस्थित सिरियन मानवी हक्क संघटना आणि दोन स्थानिक मानवी हक्क संघटनेने सांगितले. तसेच दहशतवाद्यांशी निष्ठावंत असलेल्या तिसऱ्या संघटनेनेही हवाई हल्ल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. ब्रिटनस्थित सिरिया आॅर्ब्झव्हेटरी फॉर ह्युमन राईट्सच्या माहितीनुसार या हल्ल्यात १४ अतिरेकी मारले गेले, तसेच तेल प्रकल्पालगतच्या वस्तीतील ५ जण ठार झाले. आणखी हल्ले होण्याच्या भीतीने या अतिरेक्यांनी ईशान्य सिरियातील स्वयंघोषित रक्क या राजधानीतील तुरुंगात डांबलेल्या १५० लोकांची सुटका केली आहे, असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)