प्रेयसीला भेटण्यासाठी विमानाचे अपहरण
By admin | Published: March 30, 2016 02:34 AM2016-03-30T02:34:41+5:302016-03-30T02:34:41+5:30
वेगळे राहणाऱ्या प्रेयसीच्या भेटीसाठी इजिप्त एअरच्या विमानाचे अपहरण करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी, या विमानातील सगळ्या प्रवाशांची सुखरूप सुटका झाली
निकोसिया : वेगळे राहणाऱ्या प्रेयसीच्या भेटीसाठी इजिप्त एअरच्या विमानाचे अपहरण करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी, या विमानातील सगळ्या प्रवाशांची सुखरूप सुटका झाली होती, असे अधिकृत सूत्रांनी मंगळवारी सांगितले. विमानातून एक व्यक्ती बाहेर येऊन नंतर ती धावपट्टीवर चालत आली. ती दहशतवादविरोधी पोलीस अधिकाऱ्यांच्या दिशेने हात वर करून येत होती, असे एएफपीच्या वार्ताहराने म्हटले.
अधिकाऱ्यांनी त्याला जमिनीवर बसवले व दूर घेऊन जायच्या आधी दोन मिनिटे त्याची त्यांनी झडती घेतली. तो शरण आल्यानंतर अर्ध्या तासाने पोलीस विमानात गेले. अपहरणाची ही घटना दहशतवादाशी संबंधित नसल्याचा खुलासा सरकारने केला असून अपहरण केलेल्या व्यक्तीने त्याच्यापासून वेगळे राहणाऱ्या त्याच्या प्रेयसीला भेटायची मागणी केली होती. ही प्रेयसी सायप्रसची असून ती या बेटावर राहते. द इजिप्त एअरचे एअरबस ए-३२० विमान येथील तळावर सकाळी ८.५० वाजता (स्थानिक वेळ) उतरविले गेले. त्याआधी २० मिनिटे अपहरणकर्त्याने विमानाचा मार्ग बदलण्यासाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता. अलेक्झांड्रियाहून कैरोला निघालेल्या या विमानात त्याने कमरेला बांधलेल्या स्फोटकांच्या पट्ट्यांचा स्फोट घडविण्याची धमकी दिली होती, असे इजिप्तच्या नागरी उड्डयन विभागाने सांगितले. इजिप्तचे उड्डयन खात्याचे मंत्री शेरीफ फॅथी यांनी प्रत्रकार परिषदेत बोलताना विमानाचा कॅप्टन, सहचालक, हवाई सुंदरी आणि सुरक्षा सैनिक तीन प्रवाशांसह विमानातच होते, असे सांगितले होते. अपहरणकर्त्याशी झालेल्या वाटाघाटीतून चार विदेशी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना वगळून सगळ्या प्रवाशांची सुटका झाली. विमानात आठ अमेरिकन, चार डच, चार ब्रिटिश आणि एक फ्रेंच यांच्यासह २१ विदेशी प्रवासी होते. अपहरणकर्ता इजिप्शीयन आहे. (वृत्तसंस्था)
सायप्रसच्या सिग्मा टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार त्या प्रेयसीला तिच्या ओरोकलिनी खेड्यातील घरून विमानतळावर आणण्यात आले. तिच्यासोबत लहान मूलही होते. सायप्रसच्या सरकारी रेडिओने अपहरणकर्त्याने आश्रय मागितल्याचे व दुभाषाची मागणी केल्याचे वृत्त दिले होते. संकटप्रसंगाला तोंड देण्यासाठी विमानतळावर मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.