राजकीय आश्रयासाठी विमानाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2016 05:06 AM2016-12-24T05:06:01+5:302016-12-24T05:06:01+5:30
लिबियात अंतर्गत वाहतूक करणारे अफ्रिकिया एअरलाइन्सच्या विमानाचे दोन दहशतवाद्यांनी अपहरण केले
माल्टा : लिबियात अंतर्गत वाहतूक करणारे अफ्रिकिया एअरलाइन्सच्या विमानाचे दोन दहशतवाद्यांनी अपहरण
केले आणि त्यामुळे काही तास खळबळ माजली. आमच्याकडे हँडग्रेनेड आहेत आणि आम्ही विमान उडवून टाकू, अशी धमकी देणाऱ्या या अपहरणकर्त्यांनी आधी प्रवाशांना सोडले, नंतर विमानाच्या कर्मचाऱ्यांना सोडले, त्यानंतर आम्हाला माल्टामध्ये राजकीय आश्रय द्या, अशी अट घातली. पण तीही मान्य न झाल्याने अपहरणकर्त्यांनी शरणागतीच पत्करली. (वृत्तसंस्था)
असे घडले अपहरणनाट्य
अपहृत विमान माल्टा येथे नेण्यात आले होते. विमानात १११ प्रवासी आणि ७ विमान कर्मचारी होते आणि ते लिबियातील साबा शहरातून त्रिपोलीकडे निघाले होते.
दोन्ही अपहरणकर्ते माजी हुकूमशहा गडाफीचे समर्थक आहोत, असे सांगत होते. प्रवाशांना सोडू, मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांची सुटका केली जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते.
वाटाघाटीनंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रवाशांना सोडले आणि राजकीय आश्रयाची मागणी केली. पण तीही मागणी माल्टा सरकारने मान्य केली नाही.