व्यावसायिक यानाच्या पहिल्या उड्डाणासाठी सुनीता विल्यम्सची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 04:47 AM2018-08-05T04:47:26+5:302018-08-05T04:47:57+5:30
व्यावसायिक अंतराळ यान व कॅप्सुलच्या माध्यमातून अंतराळात जाण्याच्या पहिल्या मोहिमेसाठी नासाने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह नऊ जणांची निवड केली आहे.
ह्यूस्टन : व्यावसायिक अंतराळ यान व कॅप्सुलच्या माध्यमातून अंतराळात जाण्याच्या पहिल्या मोहिमेसाठी नासाने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह नऊ जणांची निवड केली आहे. नव्या अंतराळ यानाची निर्मिती आणि संचलन बोइंग कंपनी आणि स्पेसएक्सने केले आहे.
नासाने टिष्ट्वट केले आहे की, भविष्यात अंतराळयात्री स्पेस एक्स आणि बोइंगस्पेसच्या सहकार्याने निर्मित यानाच्या माध्यमातून अंतराळ यात्रेसाठी जातील. नासाचे प्रशासक जिम ब्राइडन्स्टाइन यांनी सांगितले की, आम्ही अमेरिकी अंतराळवीरांना अमेरिकेतून रॉकेटच्या माध्यमातून पाठविण्याच्या तयारीत आहोत. नासाचे आठ सक्रिय अंतराळवीर आणि एक माजी अंतराळवीर व व्यावसायिक चालक दलाचे सदस्य वर्ष २०१९ च्या सुरुवातीला बोइंग सीएसटी -१०० स्टारलाइट व स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सुलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर जातील.
ब्राइडन्स्टाइन म्हणाले की, अंतराळ क्षेत्रात महान लक्ष्य साध्य करण्याचे आमचे स्वप्न आमच्या मुठीत आहे. अंतराळातील महारथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकी अंतराळवीरांचा हा समूह आमच्या व्यावसायिक सहयोगी बोइंग व स्पेसएक्सद्वारा निर्मित नव्या अंतराळ यानातून उड्डाण घेईल. मानव अंतराळ यानाची ही नवी सुरुवात असेल. यामुळे अंतराळ क्षेत्रात अमेरिकी नेतृत्वाला मजबुती मिळेल.
>आणखी ८ जणांचा समावेश
या नऊ अंतराळवीरांमध्ये सुनीता विल्यम्स (५२), जोस कसाडा (४५) यांचा समावेश आहे. सुनीता विल्यम्स यापूर्वी अंतराळ स्टेशनमध्ये ३२१ दिवस राहिलेल्या आहेत. नासाचे अंतराळवीर रॉबर्ट बेहकेन (४८) आणि डग्लस हर्ले (५१) हे ड्रॅगन क्रू म्हणून तर, एरिक बोए (५३) आणि निकोल मॅन (४१) कमांडर असतील. माजी अंतराळवीर आणि बोइंगचे कार्यकारी क्रिस्टोफर फर्ग्युसन (५६) हे व्यावसायिक यानाचे सदस्य असतील. याशिवाय व्हिक्टर ग्लोवर (४२) आणि माइकल होपकिस (४९) हेही उड्डाण घेणार आहेत. फ्लोरिडातील केप कॅनावेरल तळावरून कॉम्प्लेक्स ४१ वरून युनायटेड लाँच अलायन्स अॅटलस व्ही रॉकेटच्या माध्यमातून पाठविण्यात येईल.