इराकच्या सैन्य तळावर हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, ८ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 05:35 AM2024-04-21T05:35:09+5:302024-04-21T05:35:35+5:30
अमेरिका-इस्रायल म्हणाले, आमचा संबंध नाही, स्थानिक वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हल्ल्यामध्ये पीएमएफच्या एका गोदामाला लक्ष्य करण्यात आले
बगदाद (इराक) : इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी इराकमधील एका लष्करी तळावर हवाई हल्ला करण्यात आला. एका स्थानिक वृत्तसंस्थेनुसार, यात एकाचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले.
इराण समर्थित पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सच्या (पीएमएफ) मुख्यालयावर हवाई हल्ला झाल्याचे वृत्त इस्रायलच्या टाइम्सने दिले आहे. मात्र हा हल्ला कोणी केला याची माहिती मिळालेली नाही. पीएमएफच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा आरोप अमेरिकन सैनिकांवर केला आहे. मात्र अमेरिकन लष्कराने त्यांचे आरोप फेटाळून लावले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. याशिवाय इस्रायलनेही हल्ल्यातील आपली भूमिका नाकारली आहे.
आयसीस विरोधासाठी ‘पीएमएफ’ची निर्मिती
पीएमएफला हशेद अल-शाबी म्हणूनही ओळखले जाते. ही शिया पंथाची सशस्त्र गटांची संघटना आहे, जी २०१४ मध्ये जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाशी लढण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. अनेक कारवायांमध्ये या संघटनेच्या समर्थकांनी उघडपणे भाग घेतला आहे.
पीएमएफ आता इराकच्या सुरक्षा दलाचा एक भाग आहे. स्थानिक वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हल्ल्यामध्ये पीएमएफच्या एका गोदामाला लक्ष्य करण्यात आले. यामध्ये काही उपकरणे, शस्त्रे आणि लष्करी वाहनांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पीएमएफने इराक आणि सीरियामध्ये उपस्थित असलेल्या अमेरिकन सैनिकांवर हल्ले केले होते.
हमासविरुद्धच्या युद्धात अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत असल्याचे संघटनेने म्हटले होते. याच्या निषेधार्थ अमेरिकन सैन्याने हा हल्ला केला, असे पीएमएफचे म्हणणे आहे.