अल कायदाकडून तालिबानला शुभेच्छा!, काश्मीर मुक्त करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 09:35 AM2021-09-01T09:35:39+5:302021-09-01T09:36:53+5:30

Al-Qaeda congratulates Taliban : अफगाणिस्तावर पूर्णपणे ताबा मिळवल्यानंतर काही तासांतच अल कायदाने (Al-Qaeda) तालिबानला शुभेच्छा दिल्या आहेत.

Al-Qaeda congratulates Taliban, calls for Kashmir ‘liberation’ | अल कायदाकडून तालिबानला शुभेच्छा!, काश्मीर मुक्त करण्याचे आवाहन

अल कायदाकडून तालिबानला शुभेच्छा!, काश्मीर मुक्त करण्याचे आवाहन

Next

काबूल : जवळपास 20 वर्षांनंतर अमेरिकेने अफगाणिस्तान (Afghanistan) सोडले. अमेरिकेचे शेवटचे विमान काबूल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर तालिबान्यांनी आनंद साजरा केला आहे. अमेरिकी सैन्य पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर तालिबाननेअफगाणिस्तानला स्वतंत्र झालेला देश घोषित केले. या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटना अल कायदाने (Al-Qaeda)  तालिबानला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, इस्लामच्या शत्रूंच्या ताब्यात असणारी इस्लामिक भूमी (Islamic Lands) आणि काश्मीर (Jammu and Kashmir) मुक्त करण्याचे आवाहनही अल कायदा संघटनेकडून करण्यात आले आहे.  (Al-Qaeda congratulates Taliban, calls for Kashmir ‘liberation’)

तालिबानने अफगाणिस्तावर पूर्णपणे ताबा मिळवल्यानंतर काही तासांतच अल कायदाने हे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानमधील विजयाबद्दल तालिबानला दिलेल्या शुभेच्छा संदेशात अल-कायदाने म्हटले की, काश्मीर आणि इतर तथाकथित इस्लामिक भूमींना 'इस्लामच्या शत्रूंच्या तावडीतून मुक्त' करणे गरजेचे आहे. यामध्ये अल कायदाने पॅलेस्टाईन, लेवंत, सोमालिया आणि येमेनच्या मुक्तीबद्दलही म्हटले आहे. 

याचबरोबर, अल कायदाने तालिबानला लिहिलेल्या संदेशात म्हटले की, 'हे अल्लाह, लेवंत, सोमालिया, काश्मीर आणि इतर इस्लामिक भूमी इस्लामच्या शत्रूंच्या तावडीतून मुक्त कर. हे अल्लाह, जगभरातील मुस्लिम कैद्यांना स्वातंत्र्य दे.' दरम्यान, तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर दक्षिण आशियातील सर्व दहशतवादी संघटनांना नवीन ऊर्जा मिळाली आहे, त्यामुळे प्रादेशिक विश्लेषक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

फेब्रुवारी  2020 मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात एक शांतता करार झाला होता. या करारात म्हटले होते की, अमेरिकन सैन्य वापसी झाल्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबान संघटना जगातील अन्य दहशतवादी गटांशी सर्व संबंध संपुष्टात आणेल. खास करून अल कायदाशी. मात्र संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंध मॉनिटरिंग टीमने जारी केलेल्या अहवालात असं म्हटलं आहे की, तालिबानने अल-कायदाशी संबंध तोडल्याचा कोणताही पुरावा समोर आला नाही.


अफगाण आघाडीसोबत काम करू - बायडेन
अफगाणिस्तान सोडल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी आज देशाला संबोधित केले. तसेच आपली मोहिम यशस्वी ठरल्याची घोषणा केली. ते म्हणाले, आम्ही अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षे शांतता राखली. आम्ही जे काम केले आहे, ते दुसरा कोणी करू शकत नाही. तालिबान असताना तेथून जे लोक बाहेर पडू इच्छित होते, आम्ही त्यांना बाहेर काढले आहे. आम्ही १ लाख लोकांना बाहेर काढले. यावेळी काबूल विमानतळाची सुरक्षाही पाहिली गेली. तालिबानला शस्त्रसंधी करायला लावली, असा दावा बायडन यांनी केला आहे. 

आता आम्ही अफगाण आघाडीसोबत काम करू. अफगाणिस्तानची सत्ता आता तालिबानकडे आहे. तिथे आता हजारो लोकांना पाठवू शकत नाही. अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर हा आमच्या किंवा अन्य कोणत्याही देशाविरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापर केला जाऊ नये. आम्हाला जगाला सुरक्षित ठेवायचे आहे. सोमालिया आणि अन्य देशांची परिस्थिती तुम्ही पाहिली आहे. अफगाणिस्तानमधून बाहेर पडणे हे एक रणनितीचा हिस्सा आहे. अमेरिकन सैन्याच्या मदतीशिवाय ते आता कसे उभे राहतात, मजबूत होतात ते येणारा काळ सांगेल, असे बायडन म्हणाले. 
 

Web Title: Al-Qaeda congratulates Taliban, calls for Kashmir ‘liberation’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.