‘अल कायदा’ आता सिरियाला करणार लक्ष्य
By admin | Published: May 17, 2016 04:43 AM2016-05-17T04:43:51+5:302016-05-17T04:43:51+5:30
अल कायदाच्या पाकिस्तानातील वरिष्ठ नेतृत्वाने आपल्या गटाचे भवितव्य सिरियामध्येच असल्याचा निर्णय घेतला आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएने दशकभर ड्रोनने केलेल्या हल्ल्यांमुळे फारच दुबळ्या बनलेल्या अल कायदाच्या पाकिस्तानातील वरिष्ठ नेतृत्वाने आपल्या गटाचे भवितव्य सिरियामध्येच असल्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुप्तपणे डझनपेक्षा जास्त अनुभवी लोक सिरियात पाठविले असल्याचे वरिष्ठ अमेरिकन आणि युरोपियन गुप्तचरांनी तसेच दहशतवादविरोधी अधिकाऱ्यांनी सांगितले.
अल कायदाच्या वरिष्ठ जिहादींच्या हालचालींवरून या दहशतवादी संघटनेसाठी सीरियाचे महत्त्व वाढत चालल्याचे दिसते. त्यामुळे या गटाचा इस्लामिक स्टेटशी (आयएस) असलेला रक्तरंजित संघर्ष वाढू शकतो, असे पाश्चिमात्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सिरियामध्ये पर्यायी मुख्यालय स्थापन्याची प्रक्रिया सुरू करण्यास हस्तकांना तसेच इस्लामिक स्टेटला शह देण्यासाठी अल कायदाच्या सिरियाशी संलग्न असलेल्या नुसरा फ्रंटच्या माध्यमातून प्रत्यक्ष लोकांमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे.
आयएसपासून २०१३मध्ये नुसरा फ्रंट वेगळी झाली. पायाभूत म्हणता येईल अशी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत स्वायत्त राज्य (एमिरेट) स्थापन करण्यास आतापर्यंत अल कायदा आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या गटांचा विरोध होता; त्यामुळे आताचा झालेला बदल महत्त्वाचा समजला जात आहे.