अल कायदाशी संबंध; भारतीयाला शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 04:54 AM2017-11-08T04:54:00+5:302017-11-08T04:54:08+5:30
अल कायदा या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत केल्याबद्दल आणि अमेरिकेतील एका न्यायाधीशाच्या हत्येचा कट रचल्याबद्दल याहा फारुख मोहम्मद या भारतीय तरुणाला २७ वर्षे व ६ महिने शिक्षा सुनावण्यात आली आहे
वॉशिंग्टन : अल कायदा या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत केल्याबद्दल आणि अमेरिकेतील एका न्यायाधीशाच्या हत्येचा कट रचल्याबद्दल याहा फारुख मोहम्मद या भारतीय तरुणाला २७ वर्षे व ६ महिने शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर याहा फारुख मोहम्मदला मायदेशी पाठवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
मोहम्मद हा इंजिनीअरिंगच्या शिक्षणानिमित्त अमेरिकेत गेला होता. तिथे ओहियो विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर मात्र तो अल कायदाच्या संपर्कात आला. त्याने २००८ मध्ये अमेरिकेतील तरुणीशी विवाह केला आणि तो तिथेच स्थायिक झाला. अल-कायदाचा येमेनमधील नेता अन्वर अल अवलाकी याच्यासाठी मोहम्मद काम करत होता.
जुलै २००९ मध्ये याहा मोहम्मद आणि वदोन साथीदार येमेनमध्ये गेले होते. तिथे ते अन्वर अल अवलाकीची भेट घेणार होते. अवलाकी त्यांना भेटू शकला नाही. शेवटी या दोघांनी अवलाकीला कुरिअरमार्फत २२ हजार अमेरिकी डॉलर्स पाठविले. या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाणार होता. या कृत्यासाठी याहा मोहम्मदला अटकही करण्यात आली.
तुरुंगात असताना मोहम्मदने तुरुंगातील त्याच्या साथीदाराला न्यायाधीशाची हत्या करायची योजना बोलून दाखविली. ती माहिती मिळताच, एफबीआयचा एक अंडरकव्हर एजंट मोहम्मदच्या संपर्कात आला. त्याने न्यायाधीशाची हत्या करण्याची तयारी दर्शविली. ज्या न्यायाधीशांसमोर खटल्याची सुनावणी सुरू होती, त्याच्या हत्येसाठी याहा मोहम्मदने १५ हजार डॉलर्स देण्याची तयारीही दर्शविली होती. (वृत्तसंस्था)
यातील १ हजार डॉलर्स आगाऊ देण्यासाठी मोहम्मदने त्या एजंटला कुटुंबीयांची भेट घेण्यास सांगितले. अमेरिकेतील न्यायालयाने २०१५ मध्ये याहा मोहम्मदच्या भावाला व दोन मित्रांनाही दहशतवादी कारवायांप्रकरणी दोषी ठरविले होते.