सौदी अरेबियात सुरू होणार देशातील पहिले वाईन शॉप; फक्त 'या' लोकांना मिळणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 10:00 PM2024-01-24T22:00:21+5:302024-01-24T22:02:03+5:30
सौदी अरेबियात मद्यप्राशन किंवा मद्यविक्री कायद्याने गुन्हा आहे.
Alcohol Store In Saudi Arabia: सौदी अरेबियामध्ये देशातील पहिले वाईन शॉप सुरू होत आहे. देशाची राजधानी रियाधमध्ये हे वाईन शॉप सुरू होणार असून, फक्त मुस्लिमेतर डिप्लोमॅट्सला मद्य विक्री केली जाईल. विशेष म्हणजे, मद्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोबाईल अॅपद्वारे नोंदणी करावी लागेल आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून क्लिअरन्स कोड प्राप्त करावा लागेल.
इस्लाममध्ये मद्यप्राषन गुन्हा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली सौदी सरकारने व्हिजन 2030 योजनेअंतर्गत हे पाऊल उचलले आहे. तेल संसाधने कमी झाल्यानंतर अर्थव्यवस्था उभारण्यासाठी सरकारने व्हिजन 2023 योजना तयार केली आहे, त्याचाच हा भाग आहे.
डिप्लोमॅट क्वार्टरमध्ये स्टोअर उघडले जाईल
रिपोर्टनुसार, हे नवीन स्टोअर रियाधच्या डिप्लोमॅट क्वार्टरमध्ये उघडले जाईल. या भागात विविध देशांचे दूतावास असून, डिप्लोमॅट याच भागात राहतात. पण, इतर गैर-मुस्लिम प्रवाशांना मद्य मिळेल का, याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण, या निर्णयाचा संबंध क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी घेतलेल्या सुधारणांशी जोडला जात आहे. या निर्णयामुळे सौदी अरेबियाला मुस्लिम देशाचे लेबल हटवायचे आहे, असे मानले जात आहे.