Solar Storm: आधीच कोळसा संकट, त्यात काळोख्या रात्री सौर वादळ धडकणार; अनेक देशांत वीज जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 18:11 IST2021-10-11T18:03:03+5:302021-10-11T18:11:36+5:30
Solar storm will hit today: अंतराळातून येणाऱ्या नॉर्दन लाईट्स या न्यूयॉर्कमध्ये देखील दिसणार आहेत. हे सौर वादळ सूर्याचा भाग जो पृथ्वीच्या दिशेने आहे तिथे शनिवारी पाहिले गेले आहे. यामुळे ते थेट पृथ्वीवर आदळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Solar Storm: आधीच कोळसा संकट, त्यात काळोख्या रात्री सौर वादळ धडकणार; अनेक देशांत वीज जाण्याची शक्यता
वॉशिंग्टन : अंतराळातून आज मोठे सौर वादळ (Solar storm ) पृथ्वीच्या (Earth) दिशेने वेगात येत आहे. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हे सौर वादळ थेट पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असून वीज ठप्प होऊ शकते, असा इशारा दिला आहे. यामुळे आधीच विजेची टंचाई जाणवत असताना ग्रीड फेल झाल्याने वीज उत्पादनच ठप्प होण्याची शक्यता जगावर आहे.
अंतराळातून येणाऱ्या नॉर्दन लाईट्स या न्यूयॉर्कमध्ये देखील दिसणार आहेत. हे सौर वादळ सूर्याचा भाग जो पृथ्वीच्या दिशेने आहे तिथे शनिवारी पाहिले गेले आहे. यामुळे ते थेट पृथ्वीवर आदळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सौर वादळामुळे अंतराळातही हालचाली वाढल्या आहेत. अमेरिकेच्या नॅशनल ओसेनिक अँड अॅटमॉसफेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने हा इशारा दिला आहे.
या वादळामुळे जगातील अनेक देशांच्या पावर ग्रीडमध्ये बिघाड होऊ शकतो. तसेच व्होल्टेजमध्ये देखील संकट येऊ शकते. धक्कादायक बाब म्हणजे या वादळाचा परिणाम वाढू शकतो तसेच ते जी २ श्रेणीत जाऊ शकते. एजन्सीनुसार ते वेगवान होऊ शकते.
अमेरिकेच्या या एजन्सीने सांगितले की, या वादळाचा परिणाम 11 ऑक्टोबरला सुरु होईल आणि 12 ऑक्टोबरपर्यंत राहिल. ब्रिटनने देखील आकाशात रंगीत प्रकाश पाहता येईल असे म्हटले आहे. खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले की, या वादळामुळे अधिक नुकसान होण्याची शक्यता नाहीय. पृथ्वीवर सर्वात धोकादायक सौर वादळ हे 1859 मध्ये आले होते. या वादळाने अमेरिका, युरोपमधील टेलिग्राफ नेटवर्क उद्ध्वस्त केले होते. तर काही दिवसापूर्वी यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्नियाच्या प्राध्यापिका संगीता अब्दु ज्योति यांनी भविष्यातील सौर वादळांमुळे इंटरनेट उद्ध्वस्त होईल असा इशारा दिला होता.