अल्जेरियाची बॉक्सर इमान खलिफ म्हणते, मी ट्रान्सजेंडर नाही अन् मी ट्रम्पना घाबरत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 08:46 IST2025-03-24T08:45:53+5:302025-03-24T08:46:31+5:30
पुढची ऑलिम्पिक स्पर्धा २०२८ला अमेरिकेत लॉस एंजिल्स येथे होणार आहे. त्या स्पर्धेतही आपलं विजेतेपद कायम राखण्याचा इमानचा इरादा आहे.

अल्जेरियाची बॉक्सर इमान खलिफ म्हणते, मी ट्रान्सजेंडर नाही अन् मी ट्रम्पना घाबरत नाही!
अल्जेरियाची बॉक्सर इमान खलिफ तुम्हाला आठवते? २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगच्या ६६ किलो वजनीगटात तिने सुवर्णपदक पटकावलं होतं; पण हे सुवर्णपदक तिला सहजासहजी मिळालं नव्हतं. अगदी सुवर्णपदक मिळाल्यानंतरही तिला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. आजही करावा लागतोय. इमान खलिफ ट्रान्सजेंडर असून, मुळात ती स्त्री नसून पुरुष असल्याचे दावे आणि आरोप अनेकांनी केले होते. प्राथमिक फेरीत इटालियन बॉक्सर अँजेलिना कॅरिनीला केवळ ४६ सेकंदात तिनं नॉक आऊट केल्यानंतर तर या चर्चेला अधिकच बळ आलं होतं. .
संपूर्ण जगभरात यावरुन चर्चेचं मोहोळ उठलं असलं, तरी स्वत:चा आत्मविश्वास टिकवून ठेवत इमाननं अंतिम फेरीत विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. इतकंच काय, इमान खलिफवर डोनाल्ड ट्रम्प यांनीही टीका केली होती. त्याचा पुनरुच्चार करताना ट्रम्प यांनी नुकतंच म्हटलं आहे, २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत एका पुरुषानं विजेतेपद मिळवलं हे कोण विसरू शकणार आहे? त्यामुळे ट्रान्सजेंडर महिलांना आणि ‘पुरुषांना’ महिलांच्या कोणत्याही स्पर्धेत खेळण्यास यापुढे बंदी घातली जाईल, मग ती अगदी शालेय स्पर्धा का असेना.. त्यासाठी तसा कायदाच केला जाईल!..
पुढची ऑलिम्पिक स्पर्धा २०२८ला अमेरिकेत लॉस एंजिल्स येथे होणार आहे. त्या स्पर्धेतही आपलं विजेतेपद कायम राखण्याचा इमानचा इरादा आहे.
इमान म्हणते, मी ट्रान्सजेंडर, पुरुष असल्याचं समजून जगभरातून माझ्यावर टीका झाली. त्यात आंतराराष्ट्रीय खेळाडू, कोच, प्रसिद्ध व्यक्ती, अगदी काही देशांच्या राष्ट्राध्यक्षांचाही समावेश होता. कोणतीही खात्री करून न घेता, पुरावे न तपासता, मनाला वाटेल ते बोलताना मला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आलं. या गोष्टीचं मला अतीव दु:ख झालं. या वेदना, मानसिक क्लेश बाजूला सारत मी माझं मनोधैर्य टिकवण्याचा प्रयत्न केला आणि ऑलिम्पिकचं विजेतेपद पटकावलं. या टीकेतून आणि अनुभवातून मी आता आणखी तावून सुलाखून निघाले आहे. ट्रम्प यांनी माझ्यावर टीका केली, पण मी त्यांना घाबरत नाही. त्यांच्याच देशात होणाऱ्या पुढच्या ऑलिम्पिकमध्ये मी प्रत्यक्ष कृतीनंच त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सुवर्णपदक मिळविण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. ट्रम्प यांनी आता जी भूमिका घेतली आहे, ती ट्रान्सजेंडर्सच्या बाबतीत आहे आणि मी ट्रान्सजेंडर नाही!
समाजात वावरताना आपल्याला अनेक मुली, तरुणी दिसतात. मी स्वत:ला त्यांच्यातलीच एक समजते. मी मुलगी म्हणून जन्माला आले. मुलगी म्हणूनच मी वाढले आणि मला वाढवलं गेलं. माझं आतापर्यंतचं सगळं आयुष्य मी मुलगी म्हणूनच जगले आहे, कारण मी मुलगीच आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनचे नवे अध्यक्ष ऑलिम्पिकच्या सिद्धांतांशी कटिबद्ध असतील, खेळांचं निष्पक्ष मूल्य ते कायम राखतील आणि अस्सल खिलाडू वृत्तीसह ते नेतृत्व करतील अशी माझी अपेक्षा आहे. इमान पुढे म्हणते, आमच्याकडे अल्जेरियात एक म्हण आहे, ज्याच्याकडे लपवण्यासारखं काही नाही, त्यानं निडर राहिलं पाहिजे. माझ्याकडेही लपवण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे मी कोणालाच भीत नाही...