जॅक मा यांचा अलीबाबाला 'रॉकस्टार' निरोप; डोळ्यांतून अश्रू ओघळले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 02:53 PM2019-09-11T14:53:58+5:302019-09-11T14:55:13+5:30
80 हजार प्रेक्षक संख्या असलेल्या स्टेडिअममध्ये चार तास हा निरोप समारंभ रंगला होता.
हेंगझू : अलीबाबा या ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे संस्थापक जॅक मा हे काल अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. याच दिवशी त्यांचा वाढदिवस आणि कंपनीचा 20 वा वर्धापन दिवस होता. 80 हजार प्रेक्षक संख्या असलेल्या स्टेडिअममध्ये चार तास हा निरोप समारंभ रंगला होता. निवृत्तीच्या निर्णयासारखाच मा यांनी उपस्थितांना रॉकस्टारच्या वेषात येत धक्का दिला. मा यांनी वयाच्या 55 व्या वर्षी निवृत्ती स्वीकारली. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले होते.
या स्टेडिअममध्ये कंपनीचे कर्मचारी आणि पाहुणे उपस्थित होते. मा यांनी उपस्थितांना सांगितले की, आज रात्रीनंतर मी नवीन आयुष्य सुरू करणार आहे. मला विश्वास आहे की जग चांगले आहे, आयुष्यात बऱ्याच संधी आहेत. मला उत्साह आवडतो. यामुळेच मी लवकर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
तंत्रज्ञानामध्ये मोठी माहिती आणि ५जी सारख्या बदलांमध्ये समाजाला चांगले बनविण्यासाठी अलीबाबा आणखी अधिक जबाबदार बनेल. एक मजबूत कंपनी बनविणे ही सोपी गोष्ट नाहीच, पण चांगली कंपनी बनविणे हे कठीण असते. व्यावसायिक योग्यतेमुळे कंपनी मजबूत असल्याचे समजते, तर चांगली कंपनी जबाबदार आणि उदार असते., असेही मा यांनी सांगितले. तसेच गाणेही म्हटले.
जॅक मा यांनी निवृत्तीनंतर काय करणार याचा आधीच विचार केलेला होता. तसेच त्यांनी अलीबाबाचा प्रचंड डोलारा सांभाळण्यासाठीही जबाबदार व्यक्तीचा शोध घेतला होता. जॅक मा यांचे काम डेनियल झांग पाहणार आहेत. जॅक मा यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे खळबळ उडाली असून त्यांच्याशिवाय अलीबाबा कशी चालेल असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
जॅक मा यांचा प्रवास प्रेरणादायी झाला आहे. एका गरीब परिवारात जन्माला आलेले मा हे अब्जाधीश बनले. त्यांच्या वडीलांनी 40 डॉलरच्या पेन्शनमध्ये घर चालविले होते. त्यांचे आई-वडील कमी शिकलेले होते. मा यांनी हांगझू टीचर्स कॉलेजमधून इंग्रजीमध्ये पदवी घेतली होती. त्यांनी एका विद्यापीठामध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली होती. अब्जाधीश बनण्याचा प्रवास खूप संकटांनी भरलेला आहे. त्यांनी केएफसीमध्येही नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांना नोकरी मिळाली नव्हती. एवढेच नाही तर मा यांना जवळपास 30 कंपन्यांनी नोकरी देण्यास नकार दिला होता.