अलिबाबाचे बेपत्ता संस्थापक जॅक मा तीन वर्षांनी शाळेत प्रकटले, कुठे होते? कोणीच ओळखले कसे नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 03:29 PM2023-03-27T15:29:37+5:302023-03-27T15:30:19+5:30
अलिबाबाच्या मालकीच्या वृत्तपत्राने दिली माहिती... या कारणासाठी गेलेले? ५८ वर्षीय मा यांनी २०२० मध्ये आर्थिक नीतिंविरोधात आवाज उठविला होता.
चिनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करणारे अलिबाबाचे संस्थापक गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता झाले होते. कुठेच त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. चिनी सरकारनेच त्यांचे काही बरेवाईट केल्याचे बोलले जात होते. जॅक मा सार्वजनिक रित्या कुठेच दिसले नव्हते. जॅक मा बद्दल आता दिलासा देणारी अपडेट आली आहे.
चिनी मीडिया रिपोर्टनुसार जॅक मा हे वर्षभरापेक्षा अधिक काळ परदेशात राहत होते. ते आता चीनमध्ये परतले आहेत. ५८ वर्षीय मा यांनी २०२० मध्ये आर्थिक नीतिंविरोधात आवाज उठविला होता. त्यानंतर जॅक मा आता हांग्जोच्या एका शाळेत दिसले आहेत.
अलीबाबाच्या मालकीच्या वृत्तपत्राने याची माहिती दिली आहे. जॅक मा हाँगकाँगमध्ये काही काळ थांबले होते. तिथे ते त्यांच्या काही मित्रांना भेटत होते. आर्ट बेसल या आंतरराष्ट्रीय कला मेळ्यालाही भेट दिली होती, असे या वृत्तात म्हटले आहे. कृषी तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी विविध देशांमध्ये फिरत आहेत, असे यात म्हटले असले तरी ते एवढा काळ कुठे राहत होते, याची माहिती दिलेली नाही.
एकेकाळी चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मा यांनी या वर्षी जानेवारीमध्ये आर्थिक तंत्रज्ञान कंपनी अँट ग्रुपवरील नियंत्रण सोडले होते. जॅक मा कम्युनिस्ट पार्टीच्या धोरणांविरोधात बोलत होते म्हणून ते त्यांच्या निशान्यावर आले होते, असे काही तज्ज्ञांचे मत होते.
जॅक मा कुठे होते?
जॅक मा स्पेन, नेदरलँड, थायलंड आणि ऑस्ट्रेलियासह विविध देशांमध्ये दिसल्याचे सांगण्यात येत होते. फायनान्शिअल टाईम्सने मा हे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काही महिन्यांपासून जपानमध्ये राहत असल्याचे म्हटले होते. जॅक मा नजरकैदेत असल्याचे सांगितले जात होते.