Alice Sebold Rape Case: बलात्काराच्या घटनेवर पुस्तक लिहून फेमस झाली महिला; निर्दोष 16 वर्षे तुरुंगात सडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 06:17 PM2021-11-30T18:17:01+5:302021-11-30T18:19:17+5:30
Alice Sebold Rape Case: कथित पीडिता एलिस सेबोल्डने बलात्काराच्या घटनेवर पुस्तक लिहिले आणि ते बेस्टसेलर देखील झाले. यामुळे लेखिका फेमस झाली. पण कथित आरोपी जेलमध्ये निर्दोष असल्याचे ओरडत होता.
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये बलात्काराच्या एका कथित गुन्ह्यात एका व्यक्तीला 16 वर्षे तुरुंगात रहावे लागले. त्याला बलात्कार प्रकरणी दोषी मानण्यात आले होते. मात्र, तो नेहमी म्हणत होता की त्याने बलात्कार केलेला नाही. अखेर 16 वर्षांची शिक्षा भोगून झालेल्या कथित आरोपीला न्यूयॉर्कच्या सर्वोच्च न्यायालयाने आरोपातून मुक्त केले. दुसरीकडे कथित पीडितेने एलिस सेबोल्डने बलात्काराच्या घटनेवर पुस्तक लिहिले आणि ते बेस्टसेलर देखील झाले. यामुळे लेखिका फेमस झाली.
61 वर्षीय अँथनी ब्रॉडवाटरला न्याय मिळाला. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अँथनी यांनी सतत मी 'द लवली बोन्स'ची लेखिका एलिस सेबोल्डवर बलात्कार केला नाही, असेच सांगत होता. सेबोल्डने लवलीमध्ये आरोप केला होता की अँथनीने तिच्यावर बलात्कार केला आहे.
अंथनीच्या वकिलांनी सांगितले की, 16 वर्षे तो तुरुंगात राहिला. कमीत कमी पाचवेळा त्याला पेरोलपासून वंचित ठेवण्यात आले. कारण एकच तो त्याचा गुन्हा स्वीकारत नव्हता. यामुळे त्याला तुरुंगातच ठेवण्यात आले.
ब्रॉडवाटरने दोनदा लाय डिटेक्टर टेस्ट देखील पास केली होती. 1981 मध्ये सेबोल्डवर कथित बलात्कार झाला होता. 1999 मध्ये त्याची शिक्षा पूर्ण झाली. अँथनीने झालेल्या शिक्षेविरोधात पाचवेळा अपील केले होते. अखेर गेल्या आठवड्यात त्याला त्याच्या आरोपांतून मुक्त करण्यात आले. नेटफ्लिक्सनेही तिच्या पुस्तकावर फिल्म बनविली होती. या निकालानंतर ती काढून टाकण्यात आली आहे.
पाच महिन्यांनी सेबोल्डने अँथनीला पाहिलेले...
बलात्काच्या जवळपास पाच महिन्यांनी सेबोल्डने रस्त्यावर अँथनीला पाहिले होते. जेव्हा त्याला पाहिले तेव्हा तिला कथित बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची आठवण आली. मात्र, ती पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये त्याला ओळखण्यात फेल झाली. तरीही अँथनीला दोषी ठरविण्यात आले.