आता खोल समुद्रातही दिसला एलियन? अमेरिकी नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याने केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 06:08 AM2024-04-03T06:08:59+5:302024-04-03T06:09:37+5:30
Alien News: अमेरिकी नौदलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने पाण्याखालील एलियन सापडल्याचा दावा केला आहे. या दाव्यानंतर अमेरिकी सरकारने पाण्याखाली एलियन शोधण्याचा तपास सुरू केला आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकी नौदलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने पाण्याखालील एलियन सापडल्याचा दावा केला आहे. या दाव्यानंतर अमेरिकी सरकारने पाण्याखाली एलियन शोधण्याचा तपास सुरू केला आहे.
‘यूएस नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’चे (एनओएए) माजी प्रमुख टिमोथी गॅलॉडेट यांनी कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळील सागरी तळामध्ये अमेरिकी नौदलाने सोनार रेकॉर्डिंगचा वापर करून या शोधाचा दावा केला आहे. एक वस्तू डोंगराला आदळल्यानंतर घसरली आणि थांबली, याबद्दल टिमोथी यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते अमेरिकी नौदलाचे निवृत्त रीअर ॲडमिरल आहे. गेल्या १८ महिन्यात खलाशी, पाणबुडी आणि लष्करी कर्मचाऱ्यांच्या अहवालांचा अभ्यास त्यांनी केला. त्यात समुद्रात अज्ञात वस्तू दिसल्याचे म्हटले होते. याआधीही एलियन्सबाबत दावे करण्यात आले होते, मात्र पहिल्यांदाच अमेरिकी सरकारने त्याची तातडीने चौकशी करण्याचे मान्य केले आहे.
आधीही दिसले होते पाण्याखालील जहाज
- यापूर्वी अमेरिकी बॉर्डर पेट्रोल एअरक्राफ्टच्या थर्मल इमेजिंग सीस्टिमने पोर्तो रिकोजवळ अटलांटिक महासागरात प्रवेश करत असलेले हाय-स्पीड जहाज शोधले होते.
- जगभरातील यूएफओ (उडत्या तबकड्या) आणि यूएसओ दिसण्याच्या घटनांमध्ये हा शोध नवीन आहे. याआधीच्या प्रकरणांमध्ये २००४ मधील निमित्झ घटना आणि १९७६ मध्ये तेहरानमध्ये यूएफओ दिसणे यांचा समावेश आहे.
- या घटनांमुळे शास्त्रज्ञांना विश्वातील इतर ग्रहांवरील जीवनाचा शोध घेण्यासाठी मोठी मदत मिळू शकते.
पाणबुडी तैनात करण्याची शिफारस
एलियनची गुपिते उघड करण्यासाठी टिमोथी सखोल संशोधनाच्या महत्त्वावर भर देतात. त्यांनी त्या ठिकाणी रिमोट-नियंत्रित पाणबुडी तैनात करण्याची शिफारस केली. यामुळे नवीन व्हिडीओ फुटेजसह शोधाचे अधिक विश्लेषण करण्यास
मदत होणार आहे. समुद्राखालच्या या अनोळखी वस्तूंना यूएसओ म्हणून
ओळखले जाते.